धाराशिव: भाषा वेगळी, प्रांत वेगळा, पण माणुसकीचा धागा एकच… याचाच प्रत्यय धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आला. तब्बल सहा महिन्यांपूर्वी चेन्नईतून हरवलेले एक वृद्ध वडील, ज्यांना फक्त तमिळ भाषा येते, ते अखेर धाराशिवमध्ये सापडले आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा आपल्या मुला-सुनेच्या कुशीत परतले. त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू हे भाषेच्या पलीकडच्या संवादाचं प्रतीक ठरलं.
काय घडले नेमके?
ही गोष्ट आहे ९ जुलैची. सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कांबळे यांनी एका अनोळखी, बेवारस रुग्णाला रात्री ८:४५ वाजता शासकीय रुग्णालयात दाखल केलं. अडचण एकच होती – रुग्णाला मराठी, हिंदी किंवा इंग्रजीचा गंधही नव्हता. तो फक्त तमिळमध्ये बोलत होता. त्यामुळे त्याचं नाव काय, गाव काय, हे शोधणं म्हणजे समुद्रात सुई शोधण्यासारखं होतं.
एका कार्डने उघडले दारे!
रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नवनाथ सरवदे आणि महेश अटकळ यांनी हार मानली नाही. रुग्णाच्या सामानाची तपासणी करत असताना त्यांना एक व्हिजिटिंग कार्ड सापडलं. हाच तो आशेचा किरण होता! कार्डवरील नंबरवर संपर्क साधल्यावर पलीकडून इंग्रजीत उत्तर आलं, “ते माझे वडील आहेत.” मात्र, भाषेच्या मर्यादेमुळे पूर्ण संभाषण होऊ शकलं नाही. तेव्हा रुग्णालयातील तमिळनाडूच्या इंटर्न डॉक्टर अदिती धावून आल्या आणि त्यांनी दुभाष्याची भूमिका चोख बजावली. दोन दिवसांत येतो, असा निरोप मुलाकडून मिळाला.
माणुसकीच्या नात्याने उपचार
तोपर्यंत, या ‘अण्णां’ना कोणतीही कमी भासू नये, यासाठी संपूर्ण रुग्णालय कामाला लागलं होतं.अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा वैद्यकिय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ, डॉ.बालाजी भराटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स आणि ट्राॅमा वॉर्डच्या इन्चार्ज जयश्री धारेकर यांच्या नेतृत्वाखाली नर्सिंग स्टाफने त्यांच्यावर उपचार केले. त्यांची आपुलकीने सेवा केली. ही केवळ वैद्यकीय सेवा नव्हती, तर तो एक आपुलकीचा ओलावा होता, ज्यामुळे परक्या ठिकाणीही त्यांना आपलेपणा मिळाला.
अखेर तो क्षण आला…
अखेर १३ जुलै रोजी तो क्षण आला. रुग्णाचे सुपुत्र मुथ्थुराम लिंगम आणि सून नागलक्ष्मी रुग्णालयात पोहोचले. सहा महिन्यांपासून दुरावलेल्या आपल्या वडिलांना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. चेन्नईत वडील हरवल्याची तक्रार त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच दाखल केली होती. आज इतक्या दूर, दुसऱ्या राज्यात आपले वडील सुखरूप सापडल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
समाजसेवक गणेश वाघमारे, आशाताई कांबळे, अॅड. अश्विनी सोनटक्के, प्रा. दिव्या सोनटक्के, पोलिस अझहर काझी आणि इतरांच्या मदतीने रुग्णाच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात आली.डिस्चार्ज घेऊन आपल्या मुला-सुनेसोबत चेन्नईला जाताना त्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य, हेच धाराशिवच्या माणुसकीला आणि रुग्णालयाच्या अथक परिश्रमाला मिळालेले सर्वात मोठे ‘धन्यवाद’ होते!