धाराशिव – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे.ग्रामीण व शहरी भागातील या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज भरण्यास महिलांना मदत करून जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन जास्तीत जास्त महिलांना योजनेच्या लाभासाठी प्रोत्साहित करा.असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले.
आज 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कक्षातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा तालुकास्तरीय यंत्रणांकडून आढावा घेताना डॉ.ओंबासे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गिरी व श्री.गोडभरले, उपजिल्हाधिकारी श्रीमती गायकवाड व नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक तहसील जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे म्हणाले,जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणाचे अधिकारी कर्मचारी यांनी पोहोचून त्यांना अर्ज वितरित करावे.शहरी भागात हे काम वेगाने करावे. लाभार्थ्यांनी अर्ज भरले व पात्र ठरले त्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित कराव्यात.त्यामुळे लाभार्थी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येतील.किती कर्मचाऱ्यांनी किती अर्ज संकलित केले याची माहिती ठेवावी. बचत गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे.शहरी भागात अर्जाला तपासून पात्र ठरविण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना तर ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांना आहे.शहरी भागात या योजनेसाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. त्यांच्याकडून दैनंदिन अहवाल मागवावा असे त्यांनी सांगितले.
लाभार्थ्यांच्या पात्र याद्या बघून त्यांना मंजुरी देऊन त्या प्रकाशित कराव्या असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, ऑनलाइन भरलेले अर्जसुद्धा तपासून मंजूर करावे. या कामी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा घ्याव्या.ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचे अर्ज भरून घेऊन अर्जाची छाननी करावी.या कामासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित कराव्यात. सर्वांनी या योजनेसाठी प्राधान्याने काम करावे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांचा दररोज आढावा घ्यावा. कोणत्या कर्मचाऱ्यांनी शहरी भागात अर्ज जमा केले याची नोंद घ्यावी. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देता येईल असे डॉ.ओंबासे म्हणाले.
डॉ.घोष म्हणाले,ग्रामीण भागातील योजनेच्या लाभासाठी पात्र असलेली एकही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी गावपातळीवर यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनातून काम करावे.अंगणवाडी सेविकांनी किती अर्ज भरून घेतले याची नोंद घ्यावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुकास्तरीय यंत्रणांनी आणि शहरी भागासाठी काम करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाने योजनेसाठी किती महिलांनी अर्ज केले,किती महिलांचे अर्ज प्राप्त झाले आणि किती अर्ज पात्र ठरले तसेच योजनेसाठी करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली.यावेळी तहसीलदार,गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी ही माहिती दिली.