राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 14 सप्टेंबर रोजी होणारा धाराशिव जिल्ह्याचा दौरा हे केवळ एका कार्यक्रमाचे निमित्त नसून, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीची साखरपेरणी आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी परंडा येथे होणारी शिंदे यांची उपस्थिती, या जिल्ह्यातील राजकीय संघर्षाचे संकेत देत आहे.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीने धाराशिव जिल्ह्यातील चारही जागांवर विजय मिळवून भगवा फडकवला होता. मात्र, निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडींनी जिल्ह्याच्या राजकारणाला नवीन वळण दिले. शिवसेना- भाजपमध्ये फूट, महाविकास आघाडीची स्थापना, एकनाथ शिंदे यांचे बंड, आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची निर्मिती . या सर्व घटनांनी राजकीय समीकरणे ढवळून निघाली.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि उमरगा मतदारसंघातील आमदार तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटात गेले, तर कैलास पाटील उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आता अधिक गुंतागुंतीची झाली आहे. सध्या जिल्ह्यात दोन आमदार शिंदे गटाचे, एक उद्धव ठाकरे गटाचा, आणि एक भाजपचा आहे. या बदललेल्या राजकीय धारणांमध्ये आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा हा केवळ महिला सशक्तीकरणाचा मुद्दा मांडण्यापुरता मर्यादित राहणार नाही. धाराशिवमधील आगामी निवडणुकीत शिंदे गटाची भूमिका कशी असेल, याचा निर्णय त्यांच्याकडून जाहीर कार्यक्रमांच्या माध्यमातून होणार आहे. धाराशिव मतदारसंघ भाजपला जाईल का, की शिवसेना शिंदे गटाची ताकद येथे उभी राहील? हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
शिंदे गटाचे ध्येय केवळ परंडा आणि उमरगाच नव्हे, तर धाराशिव मतदारसंघही आपल्या ताब्यात घेणे हे आहे. भाजप आणि शिंदे गटात मतदारसंघावरून सुरू असलेली रस्सीखेच हे याचेच संकेत आहेत. धाराशिवमधील हा दौरा निवडणुकीच्या रणांगणातील एक पाऊल आहे, ज्यामुळे आगामी राजकीय युद्धाचे चित्र स्पष्ट होईल.
धाराशिव जिल्ह्याची ही निवडणूक लढाई म्हणजे केवळ स्थानिक राजकारण नसून, राज्याच्या राजकारणातील मोठ्या घडामोडींचे प्रतिबिंब आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती ही राजकीय वातावरणातील बदलांवर आधारित असेल, आणि हेच या निवडणुकीतील मुख्य आव्हान ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा हा निवडणुकीसाठीची जय्यत तयारी आहे. महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम असला तरी त्यामागे राजकीय साखरपेरणीचा हेतू स्पष्ट दिसतो. जिल्ह्यातील मतदारसंघात कोणते राजकीय समीकरण उभे राहते, हे आगामी काळात पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह