विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. धाराशिवसह परंडा, तुळजापूर, उमरगा या चारही मतदारसंघांमध्ये राजकीय समीकरणे उलगडू लागली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख राजकीय गटांमध्ये सध्या उमेदवारीच्या स्पर्धा तीव्र होत आहेत, आणि प्रत्येक गटामधील अंतर्गत रस्सीखेचही अधिक तीव्रतेने दिसून येत आहे.
धाराशिव मतदारसंघाबद्दल महायुतीमध्ये उत्सुकता कायम आहे, हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळणार की भाजपला, यावर सध्या चर्चा सुरु आहे. इतर तीन मतदारसंघांमध्ये मात्र विद्यमान आमदारांचे तिकीट फिक्स असल्याचे दिसते. परंतु धाराशिवमधील हा पेच कायम राहिल्यामुळे या मतदारसंघाचे भवितव्य अद्याप स्पष्ट नाही. सत्ताधारी गटात हा तिढा कसा सुटतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विरोधी गटातील स्थितीही काही कमी रोमांचक नाही. महाविकास आघाडीमध्ये धाराशिव मतदारसंघातील आमदार कैलास पाटील यांचे तिकीट निश्चित झाल्याने या मतदारसंघातील गोंधळ संपला आहे. परंतु परंडा, तुळजापूर आणि उमरगा या मतदारसंघांमध्ये उमेदवारीबाबत मोठा पेच आहे. परंडामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच सुरु असून, ठाकरे गटाकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि शंकरराव बोरकर यांच्यामध्ये स्पर्धा आहे, तर राष्ट्रवादीच्या गोटात माजी आमदार राहुल मोटे हे प्रबळ दावेदार आहेत.
तुळजापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि अणदूरचे सरपंच रामदादा आलुरे इच्छूक असले, तरी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्याही नावाची चर्चा आहे, जरी त्यांचे वय ८५ च्या वर असले तरीही ते निवडणुकीसाठी तयार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात इच्छुकांची संख्या मोठी असून, कोणता उमेदवार तिकीट मिळवतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अशोक जगदाळे, जीवनराव गोरे, सक्षणा सलगर, धैर्यशील पाटील आदी इच्छुक आहेत.
उमरग्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच आहे. ठाकरे गटाकडून विलास व्हटकर आणि स्वामी हे इच्छुक असले तरी काँग्रेसकडून अनेक इच्छुकांची भली मोठी लिस्ट तयार आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया किचकट होण्याची शक्यता आहे.
चारही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडी, मनसे, प्रहार संघटना तसेच अपक्ष यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चारही मतदारसंघात तिरंगी, चौरंगी निवडणूक होणार आहे. एकूणच सर्वच मतदारसंघात अटीतटीच्या लढती होणार आहेत.