धाराशिव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तुळजापूर आणि उमरगा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याचा ठराव पारित केला आहे. या ठरावाच्या मंजुरीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन जिल्हा काँग्रेस कार्यालयात करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील होते. या बैठकीत प्रमुख मुद्दा म्हणजे काँग्रेसने या दोन मतदारसंघांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचे ठरवले. यासाठी कार्यकर्त्यांनी विविध पातळीवर सक्रिय होऊन काम करण्याचे निर्देश दिले.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने निवडणूक लढवावी, हा ठराव मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी मांडला. यास जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद आणि जिल्हा सरचिटणीस महबूब पटेल यांनी समर्थन दिले. तसेच उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने निवडणूक लढवावी, हा ठराव राजाभाऊ शेरखाने यांनी मांडला, आणि उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर व प्रशांत पाटील यांनी मंजूर केला. हे दोन्ही ठराव टाळ्यांच्या कडकडाटात संमत करण्यात आले.
बैठकीत खलील सय्यद यांनी काँग्रेसच्या विभाग व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारणी गठीत करून तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांकडे सादर करण्याचे निर्देश दिले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी, बुथ कमिट्या स्थापन करणे, बीएलओची नियुक्ती आणि सोशल इंजिनिअरिंग धोरण अंगीकृत करणे यासारख्या विविध बाबींवर काम करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील यांनी केले.
जिल्हा प्रभारी विश्वनाथ चाकवते यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या योगदानाचा आढावा घेतला आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रयत्न आणि पराकाष्टा करण्याचे आवाहन केले. या बैठकीस अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले.