धाराशिव – काँग्रेसच्या विधी, मानवी हक्क आणि माहिती अधिकार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि धाराशिव लोकसभा अध्यक्ष ऍड. विश्वजीत शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून केसीआरच्या बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. ऍड. शिंदे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याची समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
मागील वर्षी जून २०२२ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना ऍड. विश्वजीत शिंदे यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला ऍड. धीरज पाटील यांनी केराची टोपली दाखवली होती. तसेच काँग्रेसचे संघटक राजेंद्र शेरखाने यांनी विधी विभागाच्या परस्पर बातम्या दिल्याबद्दल अवमान केला होता. त्यामुळे ऍड. विश्वजीत शिंदे हे काँग्रेसच्या स्थानिक गटबाजीला कंटाळले होते.
गेली २७ वर्षे कॉंग्रेसमध्ये राहून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून देखील उपेक्षा पदरी पडल्याने अखेर ऍड. विश्वजीत शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत केसीआरच्या बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.हैद्राबाद, तेलंगणा येथे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तथा केसीआर यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे प्रमुख नेते माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली ॲड. विश्वजीत शिंदे यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये हा प्रवेश केला आहे.
ॲड. विश्वजीत शिंदे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असून ॲड. विश्वजीत शिंदे यांना धाराशिव जिल्ह्याच्या समन्वयकपदी नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्त बदल ॲड. विश्वजीत शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.