धाराशिव – कामगार विकास कल्याण अधिकारी कार्यालयात बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली सर्रास भ्रष्टाचार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नोंदणी झालेल्या प्रत्येक लाभार्थ्याच्या अनुदानातून अर्धी रक्कम जबरदस्तीने उकळली जात आहे, अशी खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
उदाहरणार्थ, दोन मुलांसाठी प्रत्येकी २५ हजारांची मदत मंजूर झाली, तरी पालकांच्या हाती फक्त २५ हजारच पडतात. उरलेली रक्कम कार्यालयीन कर्मचारी गिळतात. ही रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी काहींना तर बोगस कागदपत्रांद्वारे “बांधकाम कामगार” बनवले जात आहे. घमेल्या-फावडा हातात देऊन फोटो काढले जात आहेत आणि अशा बनावट नोंदणीसाठी प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये उकळले जात आहेत.
यात स्थानिक दलाल सक्रीय असून, ते कमिशनच्या मोबदल्यात बनावट कामगारांची नोंदणी करून देत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे खर्या लाभार्थ्यांवर अन्याय होत असून, सरकारी निधीचा गैरवापर होतो आहे.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांतून जोरदार मागणी उठू लागली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.