धाराशिव: जिल्ह्यातील मुरूम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले लाचखोर पोलीस हवालदार एस.एस. रणखांब यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुटखा विक्रेत्याकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले आहेत.
रणखांब यांनी गुटखा विक्रेत्याकडून लाचेची मागणी केल्याचा व्हिडिओ धाराशिव लाइव्हवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये रणखांब हे गुटखा विक्रेत्याला सोडण्यासाठी लाचेची मागणी करताना दिसत आहेत. या व्हिडिओची आणि धाराशिव लाइव्हच्या बातमीची दखल घेत पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी रणखांब यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत तसेच लाचखोर पोलीस हवालदार एस.एस. रणखांब यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार हे करतील. चौकशी अहवाल सादर केल्यानंतर रणखांब यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.
चौकशी अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार:
- रणखांब यांची चौकशी करणे.
- गुटखा विक्रेत्यांचे जबाब नोंदवणे.
- व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासणे.
- आवश्यक असल्यास इतर पुरावे गोळा करणे.
काय आहे प्रकरण ?
- धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये, रात्रीच्या वेळी एक गुटखा तस्कर मोटारसायकलवरून गुटख्याने भरलेल्या गोण्या घेऊन जाताना दिसत आहे. पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी तो गुटखा पकडल्यानंतर, गुटखा तस्कर वसूलदार रणखांब यांना फोन करतो आणि राठोड यांना बोलण्यास सांगतो. रणखांब फोनवरून “आपला माणूस आहे, सोडून द्या” असे आदेश देतात. राठोड साहेबांना फोन करू का असे विचारताच, रणखांब हे साहेब माझ्यासोबतच असल्याचे सांगतात आणि गुटखा सोडून दिला जातो.
- आणखी एका व्हिडिओमध्ये एक मटका किंग मला स्वतःचा मटका धंदा सुरु करायचे सांगतो. त्यावेळी वसूलदार रणखांब दरमहा १ लाख ४० हजार हप्ता सुरु करा. साहेबांशी बोलणे झाले आहे. तुमची मिटिंग साहेबांशी करून देतो असे म्हटले आहे.