धाराशिव – वाहन खरेदीसाठी कर्ज घेऊन परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरीत ठरल्यानंतर न्यायालयाने आरोपीस धनादेशाच्या दुप्पट नुकसान भरपाई आणि व्याज देण्याचा आदेश दिला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. कामत यांनी दिलेल्या निकालानुसार आरोपीला 3 लाख 80 हजार रुपयांची नुकसान भरपाई तसेच 9 टक्के वार्षिक व्याज भरावे लागणार आहे. ही रक्कम न दिल्यास आरोपीला 6 महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल.
दारफळ येथील कर्जदार आरोपी राजेंद्र रामभाऊ इंगळे याने धाराशिव येथील समृद्धी मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीकडून एप्रिल 2019 मध्ये 4 लाख 59 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्ज थकबाकीत गेल्यानंतर त्याने परतफेडीसाठी 1 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश सोसायटीच्या हक्कात दिला. हा धनादेश अनादरीत झाल्याने सोसायटीने न्यायालयात फिर्याद दाखल केली.
सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणजेच 3 लाख 80 हजार रुपयांची नुकसान भरपाई तसेच फिर्याद दाखल केलेल्या तारखेपासून 9 टक्के वार्षिक व्याज अदा करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, ही नुकसान भरपाई न दिल्यास आरोपीस 6 महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल. या प्रकरणात फिर्यादी सोसायटीतर्फे अॅड. एन. बी. तपीसे यांनी न्यायालयात बाजू मांडली.