धाराशिव: सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन फसवणुकीद्वारे खरेदी केलेली दोन तोळे सोन्याची ऑर्डर धाराशिव सायबर पोलिसांनी रद्द करून तक्रारदाराचे 1,90,052 रुपये परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे.
तक्रारदार सैफअली सुलेमान सय्यद (वय 35, रा. ख्वाजा नगर, धाराशिव) यांना 8 मार्च 2025 रोजी अज्ञात इसमाने फोन करून त्यांच्या क्रेडिट कार्डवर विशेष ऑफर असल्याचे सांगितले. ऑफर लागू करण्यासाठी ओटीपी विचारण्यात आला आणि तक्रारदाराने तो दिल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डमधून 1,90,052 रुपये काढल्याचा मेसेज आला. तात्काळ त्यांनी सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे तक्रार नोंदवली.
तांत्रिक विश्लेषणात ही रक्कम अॅमेझॉन पे खात्यावर वर्ग झाल्याचे आढळले. तपासात इसम दीपेंद्रसिंग कुमार याने मुथुट पापाचान स्वर्णवर्शम कंपनीकडून दोन तोळे सोन्याचे कॉईन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. हे सोने ब्ल्यु डार्ट कुरिअरद्वारे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे डिलीव्हरी होणार होते. सायबर पोलिसांनी त्वरित कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर ऑर्डर रद्द करून संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत करण्यास भाग पाडले.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, तसेच पोलीस कर्मचारी कुलकर्णी, हालसे, नाईकवाडी, पौळ, जाधवर, भोसले, मोरे, तिळगुळे, कदम, काझी, सुर्यवंशी, खांडेकर, शेख यांच्या पथकाने केली.
सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेले मेसेज, लिंक, फोन किंवा क्यूआर कोड स्कॅन करु नये. तसेच सायबर फसवणुकीच्या घटनेत तात्काळ हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच आवश्यक असल्यास सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे संपर्क साधावा.