धाराशिवच्या राजकारणात प्रत्येकाची एक प्रतिमा आहे. कुणी आक्रमक, कुणी मुत्सद्दी, तर कुणी पडद्यामागचा कलाकार. पण या सगळ्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांची ओळख होती ती एका शांत, सुस्वभावी आणि वादांपासून दूर राहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याची. श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक, गूळ पावडर कारखानदार, बँकेचे संचालक म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. राजकारणात असूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. त्यामुळेच जेव्हा भाजपने दुसऱ्यांदा त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली, तेव्हा विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनीही त्यांचे अभिनंदन केले होते.
पण राजकारणाचा खेळच निराळा. इथे कधी, कुणाला, कुणाच्या बाजूने उभे राहावे लागेल, हे सांगता येत नाही. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अपेक्षेप्रमाणे, आमदार राणा पाटील यांनी मौन बाळगले. मात्र, सर्वांना आश्चर्याचा धक्का देत त्यांच्या बचावासाठी पुढे आले ते दत्ताभाऊ कुलकर्णी!
ज्यांनी कधी स्वतःहून वाद ओढवून घेतला नाही, ते दत्ताभाऊ थेट खासदार आणि आमदारांवर “पोटशूळ” उठल्याचा आरोप करत होते. विकासाची ढाल पुढे करून मूळ ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न अनेकांना रुचला नाही. ज्या दत्ताभाऊंविषयी सगळ्यांना आदर होता, ते अचानक दुसऱ्याच्या भात्यातील बाण होऊन का बरसत होते?
यावर ठाकरे सेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी थेट हल्ला चढवला. गुरव यांचा सवाल अत्यंत मार्मिक होता – “अध्यक्ष महाराज, तुम्ही पक्षाची भूमिका मांडायला आहात की कोणाची तरी वकिली करायला?” गुरव यांनी दत्ताभाऊंना त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून दिली. ज्यांनी जिल्हाध्यक्ष झाल्यावर ‘माझा भाऊ’ म्हणून मोठ्या मनाने कौतुक केले होते, तेच आज राजकीय भूमिकेमुळे विरोधात उभे ठाकले होते. गुरव यांनी तर थेट आव्हान दिले, “तुमच्यात पक्षनिष्ठा असेल, तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची पक्षातून हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवाल का?”
हा सगळा गदारोळ पाहताना एक मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो – आमदार राणा पाटील स्वतः का बोलत नाहीत? प्रत्येक वेळी ते कुणालातरी पुढे का करतात?
आणि याहून मोठा प्रश्न दत्ताभाऊंच्या प्रतिमेबद्दल आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, जेव्हा राणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा दत्ताभाऊंनी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या विरोधात आणि ओमराजे निंबाळकरांच्या बाजूने प्रचार केला होता. काळ बदलला, नेते बदलले, पक्ष बदलले आणि आता भूमिकाही बदलल्या. काल ज्यांच्यावर टीका केली, आज त्यांचीच ढाल बनून उभे राहणे, यालाच राजकारण म्हणत असतील, पण यात दत्ताभाऊंसारख्या मूळच्या सुस्वभावी माणसाची घुसमट होत नसेल का?
दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अनेकांना रोजगार दिला, स्वतःचे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. त्यांची ओळख ‘कोणाचे तरी हस्तक’ म्हणून व्हावी, हे त्यांच्या हितचिंतकांनाही पटणारे नाही. सोमनाथ गुरव यांची टीका राजकीय असली तरी त्यात एक वैयक्तिक सल आहे. ‘माझा भाऊ’ आज दुसऱ्याच्या कुटुंबासाठी माझ्यावरच टीका करतोय, ही भावना त्यामागे आहे.
राजकारणाच्या सारीपाटावर सोंगट्या पुढे ढकलाव्या लागतात, हे खरे आहे. पण स्वतःची ओळख, स्वतःचा स्वभाव गहाण ठेवून दुसऱ्याच्या हातचे ‘खेळणे’ होणे, हे दत्ताभाऊंच्या आजवरच्या प्रतिमेला शोभणारे नाही.
त्यामुळेच आज त्यांचे अनेक हितचिंतक मनातल्या मनात एकच गोष्ट म्हणत असतील… “दत्ताभाऊ, तुम्ही ‘दत्त’ राहा!”
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह