तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव जोरात सुरु आहे. तुळजापूर नगरी भाविकांनी खच्चून भरली आहे. रविवारी तर सुट्टीचा फायदा घेत जवळपास पाच लाख भाविकांनी तुळजापुरात हजेरी लावली. देवीसमोर हात जोडायला आलेल्या भाविकांच्या मनात भक्तीचा गजर असताना, काही महिलांच्या मनात मात्र दुसराच विचार फुलला आहे – ‘काय सोनं लंपास करायचं?’
भाविक देवीकडे हात जोडून उभे असले तरी, चोरी करणाऱ्या महिलांचे हात मात्र भाविकांच्या दागिन्यांकडे जोडले गेले आहेत! पोलीस या गर्दीवर नजर ठेवण्याऐवजी फक्त तोंडात शिट्या मारत, गर्दीत गायब होत आहेत, तर चोर महिला भाविकांच्या पर्स आणि दागिन्यांवर डल्ला मारत आहेत.
सोलापूरच्या लक्ष्मी लवकुश वाघमारे या महाव्दारासमोर देवीच्या दर्शनात मग्न असताना, अचानक दोन महिलांनी त्यांना धक्का देऊन तोंडावर बुक्की मारली आणि पर्स उडवून नेली. लक्ष्मीबाईंच्या पर्समध्ये रोख ३ हजार रुपये आणि इतर कागदपत्रं होती. चोरी झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या एका राजकीय पुढाऱ्यांच्या ओळखीने पोलीस ठाण्यात धडक दिली आणि आपली तक्रार नोंदवून घेतली.
पण इथेच किस्सा संपला नाही! बार्शीच्या एका महिलेचे तीन तोळे सोनं म्हणजे तब्बल दोन लाख रुपयांची चोरी झाली होती, पण पोलिसांनी तक्रार नोंदवण्याऐवजी फक्त अर्ज ठेवून घेतला. अहो, आता या चोरी करणाऱ्या महिलांना पोलिसांचं आशीर्वाद आहे की काय? की त्या हातात शिट्या मारणाऱ्या पोलिसांना काही ‘कट’ देतायत? यावरच तुळजापूरात जोरदार चर्चा रंगली आहे.
दररोज २५ ते ५० चोऱ्या होत असताना पोलिसांचा ‘अर्ज गोळा’ कार्यक्रमच सुरु आहे. पण भाविकांनी काळजी घ्यावी, देवीवर भक्ती ठेवा, पण पर्सवर मात्र डोळे ठेवा, नाहीतर ‘चोरांचे आशीर्वाद’ तुमच्या सोन्याला लागू शकतात!