पक्या: (हॉटेलमध्ये कटिंग चहा पित) “अरे भावड्या, काय चाललंय आपल्या धाराशिव मतदारसंघात? बघता बघता दोन गट पडलेत… एक ठाकरे गट, एक शिंदे गट! कोण उमेदवार होणार यावर सगळे देव पाण्यात ठेवून बसलेत!”
भावड्या: (हसत) “अरे पक्या, त्याचं काय सांगायचं! इकडे उद्धवसाहेबांचा कैलास पाटील ठरलेला आहे. त्यांचं तिकीट पक्कं. पण शिंदे गटात तर चांगलीच खेचाखेची सुरू आहे!”
पक्या: “हो, ऐक ना! शिक्षण सम्राट सुधीर आण्णा भाजप सोडून शिंदे गटात आले. त्यांना उमेदवारी हवी! आणि आपल्या कळंबचा आप्पा कापसेसुद्धा शिंदे गटात आलेत उमेदवारीसाठी! अरे, दोघेही एकमेकांच्या अंगावर घाव घालतायत!”
भावड्या: “आणि ते फक्त दोनच नाहीत, पक्या! आता तर धनंजय सावंत, पालकमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे सुद्धा भावी आमदार म्हणून होर्डिंग्ज लावून मोकळे झालेत!”
पक्या: (खोखो हसत) “हो रे, शिवसेना शिंदे गटातच दोन गट पडलेत म्हणे. एक तानाजी सावंतांचा आणि एक चौगुल्यांचा! सुधीर पाटील चौगुल्यांच्या गटात, आणि आपला आप्पा सावंतांच्या गटात. म्हणजे निवडणुकीत आधीच दोन दोन लढाई होणार!”
भावड्या: “हो, पण पक्या, महायुतीमध्येही रस्सीखेच सुरु आहे. सावंत साहेब म्हणतात धाराशिव शिवसेनेला तर राणा दादा म्हणतात धाराशिव भाजपाला …
पक्या – अजून दोघांत वाटणी ठरली नाही आणि शिंदे गटात आतापासूनच जोरात भांडण सुरु आहे.
भावड्या – होय रे पक्या , धनंजय सावंत यांनी तर तेरणा कारखान्यावर मेळावा ठेवून मीच कसा लायक आहे, हे सांगायला सुरुवात केली आहे.
पक्या: (खांदे उडवत) “अरे भावड्या, सुधीर अण्णांनी तर एकनाथ भाईना धाराशिवमध्ये आणून मेळावा घेतला तर पालकमंत्री सावंतांनी त्याला दांडी मारली! म्हणजे आपल्या इथेही दोन नटसम्राट तयार आहेत!”
भावड्या: (हसत) “संपूर्ण नाटक आहे रे हे! शेवटी कोणता गट जिंकतो, आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, ते पाहूया!”
पक्या: “हो, आणि त्यात आणखी एक आश्चर्य म्हणजे, काही दिवसांनी तिकीट भाजपला मिळालं तर सगळे एकत्र येऊन समोसा-चहा पार्टी करणार!”
(दोघेही जोरात हसतात)
भावड्या: “अरे पक्या, या निवडणुका म्हणजे एकदम ‘धाराशिव थ्री-एक्स ड्रामा’ आहे, एकदा सुरुवात झाली की थांबणारच नाही!”
(दोघे चहा संपवून हॉटेलमधून बाहेर पडतात, हसत हसत पुढच्या निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात करतात.)