धाराशिव : नळदुर्ग ते सोलापूर महामार्गावर तब्बल ९७.९६ किलो गांजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात तिन्ही आरोपींना प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १,५०,०००/- रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी:
सदर कारवाई १७ व १८ जून २०२० रोजी करण्यात आली होती. नळदुर्ग ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अणदूर गावाजवळ इनोव्हा कार (एम.एच. २५ / ए.एल. ९१९९) मधून गांजाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल विभागाचे अधिकारी व पंचांसमक्ष पोलिसांनी सापळा रचून सदर कार पकडली. वाहनाच्या झडतीमध्ये ५ प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये एकूण ९७.९६० किलोग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे १९,५९,२००/- रुपये होती, तर इनोव्हा गाडी आणि मोबाईलसह एकूण ३४,६९,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. नळदुर्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासातील खुलासे आणि अटक:
या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला गाडीतील दोन आरोपींना अटक केली होती:
-
बाळासाहेब दशरथ परबत (वय ५४ वर्षे, रा. तडवळे (म) ता. माढा जि. सोलापूर).
-
सोमनाथ दत्तात्रय कदम (वय ३१ वर्षे, रा. कदम वस्ती, कोन्हेरी ता. मोहोळ जि. सोलापूर).
पुढील तपासादरम्यान, मोबाईलचे सी.डी.आर. (CDR) व टॉवर लोकेशनवरून या गुन्ह्यात महिला आरोपी मिना ऊर्फ मिनाताई दिलीप पाटील (वय ४२ वर्षे, रा. सारोळा ता. परंडा जि. धाराशिव) हिचाही सहभाग निष्पन्न झाला. गांजा वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा कार याच महिला आरोपीच्या नावावर असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिलाही अटक करून तिच्याविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयीन प्रक्रिया व निकाल:
या खटल्यात अभियोग पक्षाच्या वतीने एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. जिल्हा शासकीय अभियोक्ता एम. बी. देशमुख यांनी केलेला युक्तिवाद आणि अभियोग पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून,जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १, श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी आज, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी अंतिम निकाल दिला.
न्यायालयाने या तिन्ही आरोपींना एन.डी.पी.एस. कायद्याचे कलम ८(क), २० (क) आणि २९ अन्वये दोषी ठरवत प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी व १ लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदीश नवनाथ राऊत आणि सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. चव्हाण यांनी केला.





