धाराशिव: शहरातील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थिनीला फी भरण्यास उशीर झाल्याने शाळेबाहेर काढल्याचे प्रकरण आता अधिकच चिघळले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उडी घेतली असून, शाळेवर अनेक गंभीर आरोप करत शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.
यापूर्वी, विद्यार्थिनी वेदिका सचिन मोरे (इयत्ता ५ वी) हिला फी भरण्यास विलंब झाल्यामुळे वर्गाच्या आणि शाळेच्या बाहेर काढण्यात आल्याची तक्रार तिच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती.
मनसेचे गंभीर आरोप
आज, दिनांक १८ जून २०२५ रोजी, मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात केवळ विद्यार्थिनीला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा उल्लेख नाही, तर शाळेच्या एकूण कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेने केलेले प्रमुख आरोप खालीलप्रमाणे:
- आर.टी.ई. कायद्याचे उल्लंघन: शाळा आर.टी.ई. अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ देत नाही, त्यांचे वर्ग वेगळे भरवते आणि त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे फी वसूल करते.
- अतिरिक्त फी वसुली: विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी घेतली जात आहे.
- ‘लातूर पॅटर्न’ची सक्ती: ‘लातूर पॅटर्न’च्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांची लाखो रुपयांची लूट केली जात आहे.
- शालेय साहित्याची सक्ती: शाळा व्यवस्थापन विशिष्ट ठिकाणाहूनच शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करत आहे.
- पालक समितीचा अभाव: नियमांनुसार आवश्यक असलेली पालक समितीची निवड शाळेने केलेली नाही.
वरिष्ठ समिती नेमून कारवाईची मागणी
मनसेने या सर्व आरोपांची चौकशी करण्यासाठी एका वरिष्ठ समितीची स्थापना करावी आणि शाळेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव लातूर येथील शिक्षण उपसंचालकांना पाठवावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली असून, पालकांच्या तक्रारीनंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने शिक्षण विभाग शाळेवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.