धाराशिव: जिल्ह्यातील अवैध आणि नियमबाह्य कला केंद्रांविरोधात जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली धडक कारवाई कायम आहे. काही दिवसांपूर्वीच ‘पिंजरा’ आणि ‘तुळजाई’ या दोन कला केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता धाराशिव तालुक्यातील आळणी येथील ‘साई कला केंद्रा’लाही टाळे ठोकण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे केंद्र कोणत्याही परवान्याशिवाय अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, केंद्राच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील ‘तुळजाई कला केंद्र’ आणि त्यानंतर धाराशिव तालुक्यातील आळणी येथील ‘पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रा’चा परवाना नियमभंग केल्याप्रकरणी रद्द केला होता. या दोन मोठ्या कारवायांनंतर आता साई कला केंद्रावरील कारवाई ही प्रशासनाची तिसरी मोठी कारवाई ठरली आहे, ज्यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
अनेक वर्षांपासून केंद्र सुरूच कसे? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, साई कला केंद्र हे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय सुरू होते, ही बाब तपासात उघड झाली आहे. त्यामुळे, ‘आजवर हे अनधिकृत केंद्र कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते?’ आणि ‘स्थानिक पोलीस प्रशासन यावर काय करत होते?’ असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
‘कला केंद्र हब’ बनणाऱ्या जिल्ह्याला प्रशासनाचा चाप
एकेकाळी देशातील तिसरा मागास जिल्हा म्हणून ओळखला जाणारा धाराशिव जिल्हा गेल्या काही काळात ‘कला केंद्रांचा हब’ बनू लागला होता. जिल्ह्यात एकूण सहा कला केंद्र सुरू होती, त्यापैकी आता तीन महत्त्वाची केंद्र बंद करण्यात आली आहेत. धक्कादायक म्हणजे, आणखी पाच ते सहा नवीन कला केंद्रांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होते. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाईमुळे अशा केंद्रांच्या मनमानीला आणि संभाव्य वाढीला मोठा चाप बसला आहे.