एका माजी उपसरपंचाचा बळी गेल्यानंतर धाराशिवच्या तथाकथित ‘सांस्कृतिक’ केंद्रांचा जो नागडा नाच चव्हाट्यावर आला आहे, तो केवळ व्यवस्थेच्या अपयशाचा नाही, तर प्रशासनाच्या निर्लज्जपणाचा आणि सामाजिक अधःपतनाचा एक जळजळीत अध्याय आहे. देवी-देवतांची पवित्र नावे धारण करून ‘तुळजाई’ आणि ‘महाकाली’ सारखी कलाकेंद्रे प्रत्यक्षात कलेचे नाही, तर गुन्हेगारी आणि विनाशाचे अड्डे बनले आहेत. या केंद्रांच्या रोषणाईत अनेकांचे संसार जळत असताना, प्रशासन मात्र या आगीवर तेल ओतण्याचे काम करत आहे की काय, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे.
विकासाच्या बाबतीत देशात तळाच्या जिल्ह्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या धाराशिवमध्ये अवैध धंद्यांचे पीक मात्र जोमात आहे. पूर्वी ज्या ‘मनोरंजना’साठी लोकांना दुसऱ्या जिल्ह्यांची वाट धरावी लागत होती, तो सामाजिक कर्करोग आता जिल्ह्याच्या नसानसांत भिनवला जात आहे. आणि हे सर्व होत असताना प्रशासन काय करत होते? जेव्हा वाशीच्या तहसीलदारांनी पोलिसांच्या स्पष्ट अहवालानंतर तुळजाई केंद्राचा परवाना रद्द करण्याची हिंमत दाखवली , तेव्हा वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्थगिती देऊन कोणाचे हित जपले? पोलिसांच्या अहवालाला केराची टोपली दाखवून पुन्हा तपासणीचा खेळ मांडण्यामागे कोणता ‘अर्थपूर्ण’ हेतू होता, याचे उत्तर जिल्हा प्रशासनाला द्यावेच लागेल.
आता पोलिसांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांपुढे जो अंतिम अहवाल सादर केला आहे, तो केवळ एक अहवाल नसून या केंद्रांच्या पापाचा घडा आहे. अवैध दारू विक्री, महिलांची छेडछाड, गंभीर गुन्ह्यांची नोंद आणि थेट आत्महत्येशी जोडलेले धागेदोरे, यानंतरही कारवाईसाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे? एका बाजूला गावातील महिला आपली तरुण पिढी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनातील काही अधिकारी या केंद्रांना वाचवण्यासाठी कायद्याच्या पळवाटा शोधत आहेत, हे चित्र भयावह आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर आज केवळ एक फाईल नाही, तर धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थ्याचा आणि प्रशासकीय नैतिकतेचा फैसला आहे. पोलिसांनी आपला ‘राजधर्म’ निभावला आहे, स्थानिक महिलांनी आपला निर्धार दाखवला आहे. आता प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेचा आहे. ते या संस्कृतीच्या ‘शवा’वर अंतिमसंस्कार करणार, की गुन्हेगारीच्या या ‘उत्सवा’ला मूकसंमती देणार? याचे उत्तर त्यांच्या एका सहीवर अवलंबून आहे आणि संपूर्ण जिल्हा ते पाहण्यासाठी थांबला आहे.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह