धाराशिव विधानसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांनी आज अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अर्चना पाटील या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा असून, तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.
मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचे चुलत दीर ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा ३ लाख मतांनी पराभव केला होता.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन पक्ष एकत्र आले असून, या तीन पक्षाच्या महायुतीने अजित पिंगळे यांना शिंदे गटातर्फे उमेदवारी दिली आहे. पिंगळे यांनी आज आपला अर्ज दाखल केला आहे.
तरीही, अर्चना पाटील यांनी महायुतीचा उमेदवार असताना, बॅकअप म्हणून अपक्ष अर्ज दाखल केला असल्याचे समजते. त्यामुळे या अर्जाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४ नोव्हेंबर ही अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे, अजित पिंगळे यांचा अर्ज बाद झाला तर अर्चना पाटील महायुतीच्या उमेदवार ठरू शकतात.