धाराशिव – धाराशिव शहरातील तांबरी विभागात राहणाऱ्या एका ७० वर्षीय सेवानिवृत्त लिपिकाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून, बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आणि जातीवाचक छळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा नोंदवला असून, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (Dy. SP) स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
याप्रकरणी सोमनाथ दादाराव डाके (वय ७०, व्यवसाय – सेवानिवृत्त लिपिक, राज्य परिवहन विभाग, रा. तांबरी विभाग, बार्शी नाका, धाराशिव ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांनी धाराशिव ( उस्मानाबाद ) येथील एका गृहनिर्माण संस्थेकडून प्लॉट खरेदी केले होते. मात्र, उस्मानाबाद गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष व्यंकटेश हंबीरे आणि सेक्रेटरी सुहास केशवराव पाटील यांनी संगनमत करून, फिर्यादी हे अनुसूचित जातीचे (महार) असल्याचे माहीत असूनही, त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित ठेवण्याच्या उद्देशाने कट रचला.
आरोपी संतोष व्यंकटेश हंबीरे आणि सुहास केशवराव पाटील यांनी सोसायटीचे बनावट लेटर पॅड आणि शिक्के तयार करून फिर्यादीच्या प्लॉट क्रमांक ९, १० ११, १७, १८ आणि २१ चे फेरफार त्यांच्या नावे होऊ नयेत यासाठी सिटी सर्व्हे कार्यालय आणि तलाठी कार्यालय, धाराशिव येथे सादर केले. ११ जुलै २०२३ आणि १४ जुलै २०२३ रोजी या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी शासकीय कार्यालयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याशिवाय, आरोपी संतोष व्यंकटेश हंबीरे आणि सुहास पाटील यांनी सीताबाई सोपान जाधव आणि सोपान आंबादास जाधव या पती-पत्नीला मदत करून आणि त्यांना उत्तेजित करून फिर्यादीच्या रिकाम्या प्लॉटवर अतिक्रमण करण्यास प्रवृत्त केले. जाधव दाम्पत्याने फिर्यादीच्या प्लॉटवर टिनपत्रे, एक जुनी जीप, भंगार साहित्य, निकामी टायर टाकून आणि पाण्याची टाकी ठेवून जागेचा ताबा घेतला. फिर्यादीला जागेचा वापर करता येऊ नये आणि दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने हे कृत्य केले जात असल्याचा आरोप आहे. फिर्यादीने म्हटले आहे की, आपण अनुसूचित जातीचे असल्याने आपल्याला येथे राहू दिले जाऊ नये या मनुवादी विचारातून आणि दहशतीच्या जोरावर आरोपींनी २०२३ पासून हे अतिक्रमण केले आहे.
फिर्यादी सोमनाथ दादाराव डाके यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राप्त तक्रार आणि कागदपत्रांच्या आधारे:
- सोपान अंबादास जाधव ( तांबरी विभाग , धाराशिव )
- सिताबाई सोपान जाधव ( तांबरी विभाग , धाराशिव
- संतोष व्यंकटेश हंबीरे ( अक्षर सदन, संघर्ष कार्यालय, गवळी गल्ली, धाराशिव )
- सुहास केशवराव पाटील ( तांबरी विभाग , धाराशिव )
या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३४०(१) (बनावटगिरी), ३(५) (अतिक्रमण/नुकसान) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ चे कलम ३(१)(g), ३(१)(u), ३(१)(z) अन्वये गुन्हा (FIR क्रमांक 0197/2025) नोंदवला आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राजाराम राठोड करत असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जागेच्या वादातून आणि जातीय विद्वेषातून हे कृत्य झाल्याचा आरोप असल्याने प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.