धाराशिव – धाराशिव शहरात डुकरे चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी विरोध करणाऱ्या तरुणांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या मित्राकडील १० हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही, तर पळून जाणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या गाडीला धडक देऊन आणि दगडफेक करून गाडीचे नुकसानही केले. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत युवराज विलास कुऱ्हाडे (वय ३० वर्षे, रा. इंदीरानगर, धाराशिव) यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते आणि त्यांचे मित्र त्यांच्या पिग फार्म हाऊसवर असताना, एमएच ३७ टी ३५२० क्रमांकाच्या मॅक्स जीपमधून सहा अनोळखी इसम आले. त्यांनी डुकरे चोरण्याच्या उद्देशाने फार्म हाऊसमध्ये प्रवेश केला आणि काही डुकरे जीपमध्ये भरण्यास सुरुवात केली.
युवराज आणि त्यांच्या मित्रांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यापैकी एकाने तलवार काढून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी युवराज यांच्या एका मित्राच्या खिशातील रोख १०,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि जीपमधून पळून जाऊ लागले.
युवराज यांनी त्यांच्या गाडीतून चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. हे पाहून चोरट्यांनी त्यांच्या जीपने युवराज यांच्या गाडीला मागून धडक दिली आणि दगडफेक करून गाडीचे नुकसान केले.
या घटनेनंतर युवराज कुऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिसांनी सहा अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) (दरोडा), ३२४(४) (नुकसान/मारहाण), ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस जीपच्या क्रमांकावरून आरोपींचा शोध घेत आहेत.