धाराशिव: शासन दरवर्षी कोटीच्या घरात वृक्ष लागवड करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन गंगासागरे यांनी मात्र हिरवेगार परिसर उजाड करण्याचा सपाटा लावला आहे. तब्बल 17 एकरचा हिरवागार परिसर आता उजाड माळरानासारखा दिसू लागला आहे.
गंगासागरेंच्या आदेशाने बेकायदेशीर वृक्षतोड!
महाविद्यालयाच्या 17 एकर परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणात झाडे होती, त्यातही काही औषधी वनस्पती होत्या. मात्र, गंगासागरे यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मोठमोठी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. एवढेच नव्हे, तर झाडे तोडता आली नाहीत, तर ती छाटून कमी करण्याचा अघोरी प्रयोगही करण्यात आला.
सहा महिन्यांपासून वृक्षतोड आणि जाळपोळीचा सपाटा!
गेल्या सहा महिन्यांत कधी वृक्ष तोडण्याचा, तर कधी झाडे जाळण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. झाडे तोडण्याचा उद्देश काय? कुणाच्या फायद्यासाठी ही वृक्षतोड केली जात आहे? याचे उत्तर गंगासागरे देणार का?
नंदनवनाचे रूपांतर भकास माळरानात!
पूर्वी हा परिसर निसर्गरम्य आणि औषधी वनस्पतींनी समृद्ध होता. येथे विद्यार्थी अभ्यास करत, संशोधन करायचे. मात्र, गंगासागरे यांच्या ‘निष्क्रिय’ पण ‘विध्वंसक’ कारभाराने हा हिरवागार परिसर आता उजाड माळरान बनला आहे.
पर्यावरणाचे मोठे नुकसान, पण कारवाई कुठे?
हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असून, बेकायदेशीर वृक्षतोड, औषधी वनस्पतींचे नुकसान आणि पर्यावरणाची हानी यावर शासनाने त्वरीत चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. वृक्षतोडीची कोणतीही अधिकृत नोंद नाही, कोणतीही परवानगी घेतली नाही – मग हा प्रकार सरळसरळ गुन्हा नाही का?
गंगासागरे उत्तर देतील, की याही प्रकरणात गप्प बसतील?
डीन गंगासागरे यांचा निष्काळजी कारभार उघड होत असताना, यावर कोणतीही कारवाई न झाल्यास हा प्रकार मोठ्या घोटाळ्याचे रूप घेऊ शकतो. आता शासन आणि महाविद्यालय प्रशासन गंगासागरे यांना जबाबदार धरणार का, की फक्त बघ्याची भूमिका घेत राहणार?
👉 पर्यावरणाची अशी वाट लावणाऱ्यांवर कारवाई होईल का, की हा प्रकारही गंगासागरेंच्या ‘गंगा’त वाहून जाईल?