धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन तीन वर्षे झाली, मात्र अजूनही येथे मूलभूत सुविधांचा अभाव आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची बेजबाबदार वृत्ती कायम आहे. महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास बंदी असतानाही जवळपास १० ते १२ वैद्यकीय अधिकारी सर्रासपणे खासगी दवाखाने चालवतात. विशेष म्हणजे, काही डॉक्टर मुख्यालयात राहण्याऐवजी लातूर आणि सोलापूर येथे वास्तव्यास आहेत.
डॉ. डुमणे आणि डॉ. चौरे यांचे खासगी हॉस्पिटल – कारवाई शून्य!
धाराशिव शहरातच कार्यरत असलेल्या डॉ. डुमणे आणि डॉ. चौरे यांनी स्वतःचे खासगी हॉस्पिटल बांधून सर्रासपणे प्रॅक्टिस सुरू केली आहे. महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात काम करायचे, मात्र प्रत्यक्षात खासगी रुग्णसेवा करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायद्याचा खेळ सुरू आहे. यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
मुख्यालय सोडणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई का नाही?
सरकारी नियमानुसार, शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. मात्र, धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टर लातूर आणि सोलापूर येथे स्थायिक झाले आहेत आणि फक्त नावापुरते धाराशिवमध्ये सेवा देत आहेत.
प्रशासन डोळे झाकून का बसले आहे?
- खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई का होत नाही?
- मुख्यालयात न राहता दुसऱ्या शहरांत राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कोण संरक्षण देत आहे?
- शासकीय सेवेत असूनही खासगी दवाखाने चालवणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई होणार का?
महाविद्यालय सुरू झाले, पण वैद्यकीय सेवा ढिसाळच!
तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अजूनही समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. येथे योग्य नियोजनाचा अभाव, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि खासगी प्रॅक्टिसच्या साखळ्या यामुळे सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. सरकार आणि आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.
सरकारी पगार घेऊन खासगी दवाखाने भरवणाऱ्या डॉक्टरांना आता रोखले पाहिजे! प्रशासन गप्प राहणार की कठोर कारवाई करणार?