धाराशिव: धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची दुरवस्था दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता एका शिपायाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा शिपाई केवळ सरकारी कर्मचारी नसून, तोच महाविद्यालयाचा सावकार आणि डीनचा खास वसूलदार असल्याची चर्चा आहे.
सावकारी आणि जबरदस्तीचा व्यवहार!
हा शिपाई महाविद्यालयात अधिकृतपणे काम करत असला, तरी त्याचा खरा व्यवसाय फायनान्स आणि सावकारी आहे. गरजू विद्यार्थ्यांना पैसे उसने देऊन तो त्यांच्याकडून जादा व्याजाने वसुली करतो. एवढेच नाही, तर महाविद्यालयातील डीनसाठी वसुली करण्याचे कामही तोच पाहतो. कोणत्याही विद्यार्थ्याने किंवा कर्मचाऱ्याने आवाज उठवायचा प्रयत्न केला, तर तो त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतो, असा आरोप केला जात आहे.
किराणा दुकानातून जबरदस्ती खरेदी
महाविद्यालयाच्या समोरच या शिपायाने स्वतःचे किराणा दुकान उघडले आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीने याच दुकानातून सामान खरेदी करायला भाग पाडले जाते. दर महाग असतानाही कुणी विरोध केला, तर त्याला वेगवेगळ्या पद्धतींनी दबावाखाली आणले जाते.
विद्यार्थ्यांवर मनमानी आणि दडपशाही
या शिपायाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांवरही आपला दबदबा निर्माण केला आहे. कोणत्या विद्यार्थ्याने कुठून खरेदी करायची, त्याने पैसे कुठून उसने घ्यायचे, हेही तोच ठरवतो. या जबरदस्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे, मात्र व्यवस्थापनाने याकडे कानाडोळा केल्याने हा प्रकार बिनधास्त सुरू आहे.
डीन आणि शिपायाचे ‘गुप्त संधान’
हा शिपाई केवळ स्वतःचाच धंदा करत नाही, तर डीनसाठीही वसुलीचे काम पाहतो. त्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवाज दडपले जात आहेत. व्यवस्थापनाच्या निष्क्रियतेमुळे महाविद्यालयातील शिक्षण आणि उपचार व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता कारवाई होणार का?
धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात एक शिपाईच इतका ताकदवान झाल्याने खरंच या संस्थेचं नियंत्रण डीनकडे आहे की या सावकाराकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पाहावे लागेल की, या प्रकरणाची चौकशी होते का, की हा शिपाई ‘बहती गंगा में हाथ धुवून’ अजून मोठे खेळ खेळतो?