धाराशिव : मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या आणि संपूर्ण विभागाला जोडणाऱ्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या नव्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना याबाबत पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. याआधी 2018-2019 मध्ये या मार्गाचे सर्वेक्षण झाले होते आणि त्यानंतरचा अहवाल 28 जुलै 2022 रोजी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, या महत्त्वाच्या मार्गासाठी 4,857 कोटी रुपयांची गरज असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.
उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा हा 240 किमी लांबीचा प्रस्तावित रेल्वे मार्ग मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विभागीय कार्यालये, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ तसेच अजिंठा-वेरूळ लेणी, जालना येथील लोह औद्योगिक केंद्र आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल.
रेल्वे मंत्रालयाने या मार्गासाठी नव्याने 6 कोटी रुपयांची मंजुरी दिली असून, लवकरच त्याचे सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.