भूम : भूम शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका तरुणाने थेट पोलीस ठाण्यात घुसून दहशत निर्माण करत पोलिसांवरच तलवारीने खुनी हल्ला केला. मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात ठाणे अंमलदाराने वार चुकवला, मात्र आरोपीने त्याच्यासोबत असलेल्या एकास तलवारीने गंभीर जखमी केले. एवढेच नाही, तर पोलीस ठाण्यातील मालमत्तेची तोडफोड करून मोठे नुकसानही केले.
याप्रकरणी शुभम संजय भोसले (वय २३, रा. कसबा भुम) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी गणेश दत्तु पाटील (वय ३७) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पाटील हे मंगळवारी रात्री भुम पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत होते. रात्री सुमारे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आरोपी शुभम भोसले हा हातात तलवार घेऊन पोलीस ठाण्यात शिरला. त्याने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पाटील यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या इराद्याने तलवारीने वार केला, मात्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत तो वार चुकवला.
यानंतर आरोपीने पाटील यांच्यासोबत असलेल्या दत्ता शिंदे यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपीचा संताप एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पोलीस ठाण्यातील टेबलावरील काच तलवारीने फोडून सुमारे १०,००० रुपयांचे नुकसान केले. तसेच, तेथे उपस्थित पोलीस हवालदार कवडे आणि अन्य एका शिंदे नामक कर्मचाऱ्यावरही तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
फिर्यादी गणेश पाटील यांच्या तक्रारीवरून आरोपी शुभम भोसले याच्यावर शासकीय कामात अडथळा, खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे, जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन करणे अशा विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०९, १३२, ११८(२), ३२४(४), १२५, ३५२, ३५१ (३) सह भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि फौजदारी दुरुस्ती कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. भुम पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.