धाराशिव – जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत १० चोरीच्या मोटरसायकलीसह आरोपीला अटक केली. या कारवाईत सुमारे ३ लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की, आबा उर्फ अशोक अर्जुन पवार (रा. उमरा, ता. कळंब) हा धाराशिव जिल्ह्यात तसेच बाहेरून मोटरसायकली चोरून आणतो. तो सध्या कळंब येथे असून त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे.
या माहितीनुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिक तपास केला असता, त्याने बीड येथून मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले. तसेच त्याने व त्याच्या चुलत्याने मिळून अनेक मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेल्या काही मोटरसायकली घराजवळील तळ्याच्या कडेला झाडाझुडपात लपवून ठेवल्याचे सांगितले.
१० मोटरसायकली जप्त, अनेक गुन्ह्यांची उकल
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मोटरसायकली जप्त केल्या. या मोटरसायकली धाराशिव शहर, कळंब, तुळजापूर, शिवाजीनगर (बीड), गेवराई (बीड), मोहळ (सोलापूर), विमानतळ (पुणे), सिंहगड रोड (पुणे) आणि स्वारगेट (पुणे) पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, तसेच पोलीस अंमलदार जानराव, निंबाळकर, वाघमारे, जाधवर, अरब, दहीहंडे आणि गुरव यांनी ही उल्लेखनीय कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांना चाप बसण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.