धाराशिव: भारतीय जनता पक्षाने धाराशिव जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत असा काही ‘गुगली’ टाकली की, अनेकांची ‘विकेट’ पडता पडता राहिली, तर काहींची थेट ‘दांडी’च गुल झाली! निष्ठावंतांचे कैवारी, दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या गळ्यात पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदाची माळ पडली आहे. या निवडीमुळे एकेकाळी राष्ट्रवादीच्या घड्याळावर ‘टाईम’ साधणारे आणि नंतर कमळ हाती घेणारे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गोटात मात्र शांतता पसरल्याचे वृत्त आहे.
धाराशिवच्या भाजपमध्ये सध्या दोन ‘पॉवर सेंटर’ असल्याची चर्चा नेहमीच रंगते. एक म्हणजे, जुने जाणते, निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा गट, तर दुसरा म्हणजे ‘न्यू एंट्री’ मारलेले, पण सध्या आमदारकीची ‘बॅटिंग’ करणारे राणा पाटील यांचा ‘आयात’ गट. राणादादांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर नशीब आजमावलं होतं, पण जनतेने ‘हात’ दाखवल्याने काही महिन्यांतच त्यांनी ‘टांग पलटी घोडा फरार’ म्हणत थेट भाजपमध्ये ‘लँडिंग’ केली. एवढंच नाही, तर धाराशिवमधून थेट तुळजापूर गाठून आमदारकीही पटकावली.
सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही लाडक्या भगिनीने आणि ओबीसी बांधवांनी ‘तारल्याने’ राणादादांची आमदारकीची खुर्ची शाबूत राहिली. कारण, मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटलांबद्दल काढलेल्या ‘प्रेमळ’ उद्गारांमुळे मराठा समाज चांगलाच ‘नाराज’ असल्याची चर्चा होती. आमदारकी मिळाली, पण मंत्रीपदाचं ‘लॉलीपॉप’ काही मिळालं नाही. ‘भावी पालकमंत्री’ हा टॅग मात्र त्यांच्या नावापुढे कायम चिकटून आहे. आता जिल्हाध्यक्षपदाच्या निमित्ताने तरी ‘वजन’ वाढेल अशी आशा होती, पण इथेही ‘पक्षाने आदेश दिला’ असं म्हणायची वेळ आली.
जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका तोंडावर असताना, भाजपने सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष बदलले. संताजी चालुक्य यांची टर्म संपायला अजून वर्षभराचा अवधी असतानाही त्यांना ‘नारळ’ देण्यात आला आणि निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या दत्ताभाऊ कुलकर्णींना संधी देण्यात आली. कुलकर्णी हे ठाकूर गटाचे खंदे समर्थक मानले जातात.
आमदार राणा पाटलांनी त्यांचे निकटवर्तीय, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावल्याची खबर होती. पण पक्षश्रेष्ठींनी, विशेषतः माजी प्रदेश सचिव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजितसिंह ठाकूर यांच्या ‘गुड बुक्स’मधील कुलकर्णींना पसंती दिल्याने, राणादादांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. यामुळे, भाजपमध्ये राणादादांची अवस्था ‘आमदार असूनही…’ अशीच काहीशी झाल्याचं राजकीय विश्लेषक कुजबुजत आहेत. एकूणच, धाराशिव भाजपमधील ही ‘फिरकी’ आगामी काळात काय रंग दाखवते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे!