धाराशिव: खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाने मोठी कारवाई करत बोगस रासायनिक खतांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सात कंपन्यांच्या नावावर बनावट खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, याचे धागेदोरे थेट गुजरातपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. वाशी तालुक्यातील एका कुक्कुटपालन शेडमध्ये हा साठा अनधिकृतपणे ठेवण्यात आला होता. याप्रकरणी वाशी पोलिसांत सात बोगस कंपन्या आणि दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेले खत नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, कृषी संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक (लातूर) साहेबराव दिवेकर आणि मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आणि कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांनी या कारवाईचे नियोजन केले होते.
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडवर मध्यरात्री छापा टाकला. यावेळी तेथे विनापरवाना साठवलेले एकूण ४५६ पोती रासायनिक खत (अंदाजे वजन २० मेट्रिक टन) आढळून आले. ज्या व्यक्तीकडे हा साठा सापडला, त्याला विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. ज्या कंपन्यांच्या नावाची ही खते होती, त्या कंपन्यांशी संपर्क साधला असता, तो लॉट नंबर त्यांच्या कंपनीचा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा खतसाठा बोगस असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकूण ४.६१ लक्ष रुपये किमतीचा रासायनिक खत साठा जप्त केला आहे. या कारवाईत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डी.ए. गरगडे, पंचायत समिती वाशी कार्यालयाचे कृषी अधिकारी अविनाश माळी, विस्तार अधिकारी श्रीकांत साळवे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील श्री. गायकवाड आणि श्री. साखरे यांचाही सहभाग होता. लातूर येथील तंत्र अधिकारी प्रवीण विठ्ठल भोर यांनी याकामी सखोल मार्गदर्शन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोगस खतांचे गुजरात कनेक्शन समोर आले असून, त्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे. तपासाअंती आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Video