धाराशिव – राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १ मे रोजी मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आलेल्या धाराशिव शहरातील नव्या बसस्थानकाची अवस्था “नाव मोठे लक्षण खोटे” अशी झाली आहे. उद्घाटनाला अवघे १६ दिवस उलटत नाहीत तोच, दोन दिवसांच्या पावसाने या तथाकथित ‘नव्या’ बसस्थानकाचे पितळ उघडे पाडले आहे. संपूर्ण परिसर चिखलाने माखला असून, गळक्या छतांमुळे प्रवासी अक्षरशः नरकयातना भोगत आहेत. प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा आणि ठेकेदाराच्या मनमानीचा हा उत्तम नमुना असून, जनतेच्या पैशाचा कसा चुराडा होतो, हेच यातून सिद्ध झाले आहे.
अपूर्णावस्थेतील उद्घाटनाचा घाट कशासाठी?
उद्घाटनाच्या दिवशीच अनेक कामे अपूर्ण असल्याची ओरड असतानाही, केवळ “रस्त्याचे काम बाकी आहे” अशी थातुरमातुर सारवासारव करत प्रशासनाने उद्घानाचा घाट घातला. लाईट फिटिंग, पंखे, दरवाज्यांची दुरुस्ती, परिसराची स्वच्छता अशा अनेक मुलभूत सुविधा आजही ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. मग प्रश्न असा उभा राहतो की, ही घाई नेमकी कशासाठी? कुणाच्या फायद्यासाठी? जिल्ह्याला परिवहन मंत्री पालकमंत्री म्हणून लाभले असताना, बसस्थानक आधुनिक आणि आदर्श होण्याऐवजी गैरसोयींचे आगार बनले आहे, हे धाराशिवकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
प्रवाशांचा संताप अनावर: चिखल तुडवत गाठावी लागतेय बस
१५ आणि १६ मे रोजी झालेल्या पावसाने बसस्थानकाच्या कामाचा दर्जा पूर्णपणे उघड केला. छत गळत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, तर स्थानकाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांना, विशेषतः महिला आणि वृद्धांना, हा चिखल तुडवतच बस पकडावी लागत आहे. या मनस्तापामुळे प्रवासी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फेरले गेले आहे.
जबाबदारी निश्चित करून तात्काळ कारवाई करा!
हा प्रकार म्हणजे जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे. संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ जबाबदारी निश्चित करून, प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी जनतेला वेठीस धरणारे प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या प्रश्नांना काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत धाराशिवकर गप्प बसणार नाहीत, हे मात्र निश्चित!