धाराशिव: मैत्रीच्या आणि आपुलकीच्या संबंधापोटी मुलीच्या लग्नासाठी दिलेले हातउसने पैसे परत न करता, फसवणुकीच्या उद्देशाने खोटा धनादेश (Cheque) देणाऱ्या इसमाला धाराशिव येथील न्यायालयाने दणका दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि २ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. व्ही. मेढे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
नेमकी घटना काय?
या खटल्यातील फिर्यादी काशिनाथ हनुमंत भोजने (रा. चिखली) यांनी त्यांचे मित्र आरोपी भगिरथ अंबऋषी कावळे (रा. केकस्थळवाडी, ता. जि. धाराशिव) यांना २०१५ मध्ये मदत केली होती. कावळे यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी आणि लोकांचे देणे देण्यासाठी भोजने यांच्याकडून २ लाख रुपये हातउसने घेतले होते. ही रक्कम जानेवारी २०१६ पर्यंत परत करण्याचे ठरले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही आरोपीने पैसे परत केले नाहीत.
शेवटी, फसवणुकीच्या उद्देशाने आरोपीने २६ मे २०१६ रोजी ‘बँक ऑफ इंडिया’चा २ लाख रुपयांचा धनादेश फिर्यादीला दिला. फिर्यादीने हा धनादेश बँकेत जमा केला असता, तो न वटता परत आला (बाऊन्स झाला).
न्यायालयीन लढा आणि शिक्षा
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काशिनाथ भोजने यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये न्यायालयात धाव घेतली. या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे स्वतः फिर्यादी आणि साक्षीदार हमीद देशमुख यांचे जबाब नोंदवण्यात आले. आरोपीने न्यायालयात दिशाभूल करणारा खोटा जबाब आणि पुरावा देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, फिर्यादीचे वकील ॲड. महेश पंढरीनाथ निंगुळे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाचा आदेश:
-
दंड: आरोपी भगिरथ कावळे याला २,५०,०००/- (दोन लाख पन्नास हजार) रुपयांचा दंड.
-
शिक्षा: ६ महिने सश्रम कारावास.
-
दंड न भरल्यास: दंडाची रक्कम एक महिन्यात न भरल्यास, आरोपीला अतिरिक्त एक महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.
या खटल्यात फिर्यादीच्या वतीने ॲड. महेश पंढरीनाथ निंगुळे यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. निखिल सतीश शेंडगे यांनी सहकार्य केले.







