धाराशिव – धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस तीन महिने कारावास व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी श्री. दत्तात्रय साठे यांनी सुनावली. तसेच, आरोपीस पाच हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च भरावा लागणार आहे.
आरोपी संजय महादेव माने (रा. येवती) यांनी जयलक्ष्मी शुगर प्रॉडक्ट्स प्रा. लि. नितळी यांच्यासोबत ऊस तोडणी आणि वाहतुकीचा करार केला होता. करारानुसार, वसंतदादा बँकेकडून 4.50 लाख रुपयांची आगाऊ रक्कम घेतली होती. मात्र, संजय माने यांनी उस वाहतूक न करता कारखान्याला अडचणीत आणले. कराराच्या अटीप्रमाणे कारखान्याने त्यांच्याकडून पैसे परत मागितले असता, त्यांनी 2013 साली 3.50 लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, बँकेत तो जमा केल्यावर खात्यात अपुरी शिल्लक असल्याने तो अनादरीत ठरला.
यानंतर, जयलक्ष्मी कारखान्यातर्फे सुरेश भोरे यांनी वरिष्ठ विधिज्ञ ॲड. विजयकुमार शिंदे यांच्यामार्फत आरोपीस रक्कम परत करण्याची नोटीस दिली. मात्र, पैसे न मिळाल्याने कलम 138, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली. पुढे, सुरेश भोरे यांनी कारखान्यातील नोकरी सोडल्याने संजय रामचंद्र दुबे यांनी फिर्यादी म्हणून काम पाहिले.
प्रकरणाच्या सुनावणीत फिर्यादी संजय दुबे आणि वसंतदादा बँकेचे मॅनेजर मुंडे यांनी साक्ष दिली. ॲड. विश्वजीत शिंदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश साठे यांनी आरोपीस शिक्षा सुनावली.
या प्रकरणात शिंदे लॉ फर्म यांनी फिर्यादी जयलक्ष्मी कारखान्याची बाजू मांडली. ॲड. विजयकुमार शिंदे व ॲड. विश्वजीत शिंदे यांना ॲड. अजित राठोड, ॲड. भाग्यश्री रणखांब, ॲड. ज्योती जगताप व ॲड. पृथ्वीराज दंडनाईक यांनी सहकार्य केले. तसेच, मोहरील पवन पांचाळ यांनीही मदत केली.