धराशिव: शहरातील एम.आय.डी.सी. परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक नागरिकांनी जिवाची बाजी लावून पकडले. मात्र, पोलिसांना वेळेवर माहिती देऊनही तब्बल एक तास उशिराने पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलिसांच्या निष्काळजीपणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तुळजाई नगर एम.आय.डी.सी. परिसरातील शिंगोली भागात, अक्षय मेटल चौकाजवळ ६ ते ७ दरोडेखोर दबा धरून बसल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती मिळताच पाशाभाई शेख आणि शिवशंभू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी धाडसाने त्यांचा पाठलाग केला. अंधाराचा फायदा घेत काही दरोडेखोर पळाले, परंतु यातील तिघांना पकडण्यात नागरिकांना यश आले. त्यांच्याकडे घातक शस्त्रे आणि दरोड्याचे साहित्य आढळून आले.
पोलिसांच्या विलंबावर प्रश्नचिन्ह
पाशाभाई शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मध्यरात्री १ वाजून ०५ मिनिटांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन करून माहिती दिली होती. त्यानंतर १:३७ आणि १:५२ वाजता पुन्हा फोन करून जमाव आक्रमक होत असल्याचे आणि गाडी लवकर पाठवण्याची विनंती केली. मात्र, आनंदनगर पोलिसांची गाडी घटनास्थळी २ वाजून १० मिनिटांनी, म्हणजे तब्बल एक तासाने पोहोचली. विशेष म्हणजे, या गाडीसोबत पी.एस.आय. किंवा ए.पी.आय. दर्जाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
उशिरामुळे अन्य दरोडेखोर पसार?
पोलीस ठाणे ते घटनास्थळ हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांचे असताना पोलिसांना येण्यास एवढा उशीर का झाला? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. पोलीस वेळेवर आले असते तर पळून गेलेले अन्य ३-४ दरोडेखोरही सापडले असते. पोलिसांच्या उशिरानी ते पसार झाले असून, आता नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे शेख यांनी म्हटले आहे.
श्रेयवादाची लढाई आणि मागणी
एकीकडे नागरिकांनी जिवाची पर्वा न करता दरोडेखोरांना पकडले असताना, आनंदनगर पोलीस मात्र आपली पाठ थोपटून घेत असल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन त्या रात्री गस्तीवरील वाहने कोठे होती, अधिकारी व कर्मचारी यांचे कॉल रेकॉर्ड्स (CDR) तपासावेत आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पाशाभाई शेख यांनी केली आहे.
आरोपींची नावे: या प्रकरणी पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे: १. हिरसिंग प्रेमसिंग जुनी (वय २५ वर्षे, रा. फुलेनगर, परळी, जि. बीड) २. आकाश महादेव कपाळे (वय २६ वर्षे, रा. खोब्रागडे गल्ली नं. १, साठे चौक, नांदेड) ३. सतनामसिंग गुरुमुकसिंग चव्हाण (वय ३५ वर्षे, रा. नवा मोंढा, वसमत, जि. हिंगोली) ४. इतर दोन अज्ञात इसम
या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गोविंद गुरनाथ पतंगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१० (४) आणि (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.
थोडक्यात:
-
तक्रारदार: पाशाभाई शेख (तालुकाध्यक्ष, मनसे, धाराशिव)
-
घटनास्थळ: तुळजाई नगर, एमआयडीसी, धाराशिव
-
प्रमुख मागणी: आनंदनगर पोलिसांच्या विलंबाची आणि निष्काळजीपणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.







