धाराशिवच्या गणेश नगर कचरा डेपोचा “सुवास” आता लातूरपर्यंत पोहोचला आहे. या कचरा डेपोमध्ये टाकल्या गेलेल्या जनावरांच्या कापलेल्या मांसामुळे परिसरातील नागरिकांना ‘फ्रॅश’ वातावरणाचा अनुभव मिळत आहे. गणेश नगर लगतच्या भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही या दुर्गंधीत “प्रकृतीसाठी पथ्य” पाळण्याची संधी मिळाली आहे! सायन्सच्या पुस्तकात श्वसनाचे रोग वाचण्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे, हा ‘अनुभव आधारित शिक्षणाचा’ खास प्रयोगच म्हणावा लागेल.
परिसरातील श्वास घेण्याची नवी पद्धत समाजाला शिकवणाऱ्या या डेपोतील कुत्रेही कचऱ्यातील खास डिश ‘कापलेले मास’ वर मनसोक्त ताव मारत आहेत. शिवसेना युवा (ठाकरे) ने त्याच कचऱ्याची गाडी भरून, ‘कचरा हल्ला’ म्हणून नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात रिचवली. या प्रकारामुळे नगर परिषदेच्या अधिकारीवर्गाने कचरा डेपो हलविण्याचा विचार करावा लागेल, असा ‘दुर्गंधीमय’ इशारा त्यांनी दिला आहे.
धाराशिवचे मुख्याधिकारी, वसुधा फड, धाराशिवला भेट देण्यापेक्षा लातुरात सुट्टीचा आनंद घेतात. त्यामुळे धाराशिवच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष कमी आणि लातूरच्या बाजारातल्या सेलवर जास्त असेल, हे उघड आहे. फड मॅडमना बदलीची प्रतीक्षा असल्याने धाराशिवचे प्रश्न त्यांच्यासाठी तात्पुरते “कचऱ्यात” टाकले आहेत. यापूर्वीचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे हे गुन्हेगारीचा सुगंध घेऊन बाहेर आले असून त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. धाराशिवच्या प्रशासकीय व्यवस्थेत कचऱ्याचा वास कमी आणि समस्या जास्त असल्याचे यावरून स्पष्ट होते.
कचरा डेपो हलविण्यात येणार की धाराशिवच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तोपर्यंत, धाराशिवकरांनी श्वास घेताना नाकाला मास्क बांधून ठेवण्याचा उपाय अंगिकारावा, कारण येथे कचरा नेहमीच्या जागेवर आहेच, पण नगर परिषदेचे ‘प्रशासकीय कचरा’ पण त्याच उत्साहात आहे!