धाराशिव : धाराशिव शहरातील डी मार्ट समोर राष्ट्रीय महामार्ग 52 रोडवर दुचाकीच्या धडकेत दिलीप तुकाराम वाकुरे (पाटील) रा. ढोकी ता. जि. धाराशिव यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 16 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 ते 7.15 वाजण्याच्या सुमारास घडला.
माहितीनुसार, दिलीप वाकुरे हे डी मार्ट धाराशिव समोर कारमध्ये बसण्यासाठी जात असताना, रॉयल इंफिल्ड बुलेट क्र. एमएच 13 ई बी 1644 ने पाठीमागून जोरदार धडक दिली. या बुलेटचा चालक विक्रांत राजेंद्र जोगदंड (रा. जुळे सोलापूर ता. जि. सोलापूर) याने आपल्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून अपघात घडवला.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिलीप वाकुरे यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत दिलीप वाकुरे यांचा मुलगा सत्यजीत दिलीप वाकुरे (पाटील) रा. सुतार गल्ली ढोकी ता. जि. धाराशिव यांनी 20 मार्च 2025 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात प्रथम खबरेवरून फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विक्रांत जोगदंड याच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास आनंदनगर पोलीस करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या मृत्यू, चालक पसार
उमरगा : उमरगा तालुक्यातील महादेव गल्ली येथील दत्तु मनोहर पिस्के (वय 59 वर्षे) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात 21 मार्च 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता घडला.
दत्तु पिस्के व अमोल मिरकले हे दोघे मोटरसायकल क्रमांक एमएच 25 डब्ल्यु 6579 वरून जात असताना अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दत्तु पिस्के हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यावर अज्ञात वाहनचालकाने जखमीस उपचारासाठी नेण्याऐवजी वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेबाबत दत्तु पिस्के यांचे पुत्र किरण दत्तु पिस्के (वय 37 वर्षे) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय दंड विधान संहिता कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) सह मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उमरगा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.