धाराशिव – धाराशिव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक, धाराशिव, यांच्या कार्यालयाने आज, दिनांक ९ जुलै २०२५ रोजी, अनेक पोलीस निरीकांच्या बदल्यांचे आणि नवीन पदस्थापनेचे आदेश जारी केले. या फेरबदलांमध्ये अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या धाराशिव शहर आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी मिळाले आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आणि प्रशासकीय निकडीनुसार या बदल्या करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. काही बदल्या या मुदतपूर्व असून, त्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांची मान्यता घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बदल्या खालीलप्रमाणे:
- पोलीस निरीक्षक/मनिष मोहन पाटील: यांची प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय), धाराशिव येथून प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, धाराशिव ग्रामीण येथे तात्पुरत्या स्वरुपात बदली करण्यात आली आहे.
- पोलीस निरीक्षक/कुमार भगवान दराडे: यांची प्रभारी अधिकारी, तात्पुरत्या स्वरुपात जिविशा, धाराशिव येथून प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, धाराशिव शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- पोलीस निरीक्षक/आमोद रामचंद्र भुजबळ: सध्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, धाराशिव ग्रामीण, यांची बदली पोलीस नियंत्रण कक्ष, धाराशिव येथे तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे.
- पोलीस निरीक्षक/शेख शकील शेख लाल: सध्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, धाराशिव शहर, यांची बदली पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), धाराशिव येथे तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे.
- पोलीस निरीक्षक/श्रीगणेश साहेबराव कानगुडे: यांची प्रभारी अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा, धाराशिव येथून प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, भुम येथे बदली झाली आहे.
- पोलीस निरीक्षक/प्रल्हाद चंदरराव सुर्यवंशी: भुम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, यांची बदली आता प्रभारी अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा, धाराशिव येथे करण्यात आली आहे.
- पोलीस निरीक्षक/मारोती निवृत्ती शेळके: यांचा बदलीचा विनंती अर्ज अमान्य करण्यात आला असून, ते पोलीस नियंत्रण कक्ष, धाराशिव येथे कायम आहेत.
या सर्व बदल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने विविध बाबींचे बारकाईने अवलोकन करून आणि सर्वानुमते निर्णय घेऊन केल्या आहेत. आदेशात नमूद केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होऊन त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी दिले आहेत.
लाचखोरी प्रकरणानंतर धाराशिव शहर पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी; कुमार दराडे नवे प्रभारी
धाराशिव: येथील शहर पोलीस ठाण्यातील गाजलेल्या लाचखोरी प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक शकील शेख यांची अखेर बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी शेख यांची उचलबांगडी करत, त्यांची पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), धाराशिव येथे तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी आता कुमार भगवान दराडे हे शहर पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी असतील.
काही दिवसांपूर्वी धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल मोबीन शेख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या भूमिकेवर संशयाची सुई निर्माण झाली होती.
लाचखोर पोलीस हेड कॉन्स्टेबल मोबीन शेख याने “आपण साहेबांना विचारून सांगतो,” असे म्हटल्याची एक ऑडिओ क्लिप तपासात समोर आली होती. ही ऑडिओ क्लिप न्यायालयाच्या रेकॉर्डवर देखील सादर करण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी अखेर शकील शेख यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनला नवे निरीक्षक, लाचखोर अधिकाऱ्याच्या जागी मनिष पाटील यांची नियुक्ती
धाराशिव: लाच घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांच्या जागी मनिष मोहन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका महिलेकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना शेळके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले होते, ज्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांनी एका महिलेच्या कामासाठी तिच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. पीडित महिलेने याची तक्रार थेट एसीबीकडे केली. तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचला आणि शेळके यांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली. या कारवाईनंतर पोलीस दलात खळबळ उडाली होती आणि शेळके यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.शेळके यांच्या निलंबनामुळे रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदावर आता मनिष मोहन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते लवकरच आपला पदभार स्वीकारतील.