धाराशिव शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी तब्बल ८ कोटींचे टेंडर बारामतीच्या एका श्रीमंत कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र, हा कंत्राटदार धाराशिवकडे फिरकलाही नाही! त्याच्या केवळ दोन कर्मचाऱ्यांवर संपूर्ण शहराची स्वच्छतेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना शहराची तोंडओळखही नाही, मग स्वच्छतेची काय अपेक्षा?
घंटागाड्या बेपत्ता, कचऱ्याचे साम्राज्य!
शहरातील अनेक भागांत घंटागाड्या गायब झाल्यामुळे नागरिकांना कचरा टाकण्यासाठी रस्त्यावरच तो फेकण्याची वेळ आली आहे. कॉलन्या कचराकुंडीत बदलल्या असून, गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. इतकेच नाही, तर गटारांची नियमित स्वच्छता न झाल्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्याही वाढल्या आहेत.
कचऱ्याचा धूर जीवघेणा, नागरिकांचा संताप अनावर!
धाराशिव नगरपरिषदेच्या देशपांडे स्टँडजवळील कचरा डेपोमधून सातत्याने निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या भागांतील नागरिकांना विशेष त्रास
➡ उमर मोहल्ला
➡ ख्वाजा नगर
➡ गणेश नगर
➡ दरगाह रोड
➡ तालिम गल्ली
➡ बस डेपो परिसर
➡ आयुर्वेदिक महाविद्यालय परिसर
➡ अहिल्याबाई होळकर चौक
➡ आगड़ गल्ली
या भागांत श्वास घेणेदेखील कठीण झाले असून, लहान मुले, वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर व्यक्तींना खोकला, श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचेच्या समस्या भेडसावत आहेत.
१० फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा!
संतप्त नागरिकांनी १० फेब्रुवारी रोजी धाराशिव मर्दिनी मंदिर कमान येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ५ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा रोष!
नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
✔ कचरा डेपोमधून धूर त्वरित बंद करावा.
✔ डेपो शहराच्या किमान १० किमी अंतरावर हलवावा.
✔ स्वच्छता व्यवस्थापनाचा ठोस आराखडा तयार करावा.
जर प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केली नाही, तर मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे!
“शहर कचऱ्यात, प्रशासन मलिद्यात!”
नगरपरिषदेच्या “स्वच्छता टेंडर” नावाखाली सुरू असलेल्या गोंधळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ८ कोटी खर्चूनही शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गाडले गेले आहे. एकीकडे अधिकारी मलिदा खात असताना, दुसरीकडे सामान्य जनता दुर्गंधीत आणि प्रदूषणात जगण्यास मजबूर आहे!
१० फेब्रुवारीला होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रशासन जागे होणार की अधिक गाढ झोपणार?