धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचं नाव सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चेत आहे, तेही त्यांच्या कामगिरीपेक्षा वादांमुळे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप झाल्यानंतर साहेब चांगलेच अडचणीत आले. मीडियाने या प्रकरणावर “सर्व्हिस बातम्या” चालवून त्यांच्या प्रतिमेचं अक्षरशः धुव्वा उडवलं. त्यांचा मानहानीचा आलेख उंचावला, आणि अखेर सरकारने त्यांना “गुलाबी थंडीतली मसुरी यात्रा” म्हणजेच एक महिन्याचं विशेष ट्रेनिंग गिफ्ट दिलं.
B ग्रेडमध्ये ट्रेनिंग पास!
मसुरीच्या त्या आल्हाददायक थंडीत साहेबांनी ट्रेनिंगचा मनापासून आनंद घेतला, पण हाय रे किस्मत, निकाल मात्र B ग्रेड! अर्थात, हे निकाल फार गंभीरतेने न घेता, साहेब पुन्हा धाराशिवला परतले. मात्र, परतण्याआधीच बदलीची हवा सुरू झाल्याने साहेबांनी “प्रतिमेच्या क्लीनिंग मोड”मध्ये प्रवेश केला.
अचानक भेटींचं सत्र सुरू
परतीच्या दुसऱ्याच दिवशी साहेबांनी जिल्हा परिषद आणि नगर परिषद कार्यालयांना अचानक भेटी दिल्या. तिथल्या अस्वच्छतेवर त्यांनी नाक मुरडलं, राग व्यक्त केला, आणि वरतून “या गोष्टी बदलल्या पाहिजेत” असा नेहमीचा प्रशासनिक डायलॉग दिला. पण साहेबांनी प्रत्यक्ष कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. असं वाटतं, मसुरीच्या ट्रेनिंगमध्ये “आढावा घ्या, पण काही करू नका” हा विषय फार चांगल्या प्रकारे शिकवला असावा.
डव्हळेंची प्रतिमा साहेबांना खुपली
धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांची स्वच्छ प्रतिमा साहेबांच्या “मलीन प्रतिमेच्या पुनर्बांधणी” अभियानाला अडथळा ठरली. डव्हळे यांचं काम लोकांच्या मनात एक सकारात्मक प्रतिमा निर्माण करत होतं, जी साहेबांना कदाचित असह्य झाली. शेवटी, साहेबांनी त्यांच्या विरोधात खोटे आरोप उभे करून त्यांना निलंबित केलं.
“प्रतिमेचं राजकारण” की क्लीनिंग मोड?
साहेबांच्या या कृतीमुळे धाराशिवच्या जनतेत चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या विकासाऐवजी साहेबांनी स्वतःच्या प्रतिमेचं सौंदर्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलंय. जिल्ह्यातील प्रशासनात अधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण गडद होत आहे, तर दुसरीकडे सामान्य जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी साहेबांकडे वेळ नाही, हे स्पष्ट होतंय.
B ग्रेड अधिकारी, A ग्रेड काम कधी?
धाराशिवकरांना एकच प्रश्न सतावतोय – मसुरी ट्रेनिंगमधून B ग्रेड घेऊन आलेल्या साहेबांकडून A ग्रेड कामाची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल का? जिल्ह्यातील प्रशासन त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षम होईल की आणखी गोंधळ निर्माण होईल, याचा निर्णय आता काळच देईल.
दरम्यान, साहेबांची बदली होण्याच्या बातम्या जोरदार असल्याने धाराशिवकरांनी याला “प्रतिमेचं राजकीय ड्रामा” नाव दिलंय. आता पाहायचं एवढंच की साहेबांना “मलीन प्रतिमा क्लीन” करण्यासाठी अजून किती गुलाबी थंडी अनुभवावी लागणार आहे!