धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या शासकीय कामांशी संबंधित अडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून ‘जनता दरबार’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती जिल्हा प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या उपक्रमांतर्गत, जिल्ह्यातील कोणताही नागरिक आपल्या शासकीय कामकाजातील अडचणी किंवा तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडू शकणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आठवड्यातील प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत नागरिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ शकतील. या भेटीदरम्यान नागरिक आपल्या समस्यांवर संवाद साधू शकतात आणि आपले अर्ज सादर करू शकतात.
निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या ‘जनता दरबार’ उपक्रमाचा लाभ घ्यावा व आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे.