धाराशिव जिल्ह्यात सध्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने काम करत, नियमानुसार होणाऱ्या चौकशी प्रक्रियेला पायबंद घातल्याचे उघड झाले आहे. एका उपजिल्हाधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी नियम डावलून दुसऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
चौकशी नियम डावलून बेकायदेशीर निर्णय
प्रशासनाच्या नियमानुसार, उपजिल्हाधिकारी स्तराच्या अधिकाऱ्याची चौकशी विभागीय आयुक्त स्तरावरील उपायुक्त किंवा किमान अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करणे बंधनकारक आहे. परंतु धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे नियम धाब्यावर बसवत, एका महिला उपजिल्हाधिकाऱ्याला ही जबाबदारी सोपवली. संबंधित महिला अधिकारी विशाखा समितीच्या नावाखाली ही चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले, परंतु ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे जाणकारांचे मत आहे.
हट्टापायी बळीचा बकरा
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या बेकायदेशीर चौकशीच्या आधारे उपविभागीय अधिकारी ढवळे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. दुर्दैवाने, शासनानेही चौकशी न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीला मान्यता दिली आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना निलंबित केले.
उपविभागीय अधिकाऱ्यांची विनंती
या प्रकरणानंतर निलंबित उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे यांनी शासन व विभागीय आयुक्त यांना पत्र लिहून विशाखा समितीची स्थापना विभागीय आयुक्त स्तरावर करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, या प्रकरणाची न्यायपूर्ण चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
चोर सोडून संन्याशाला फाशी?
धाराशिव जिल्ह्यात सध्या “चोर सोडून संन्याशाला फाशी” अशी स्थिती निर्माण झाली आहे. सूडबुद्धीने होणाऱ्या या निर्णयांमुळे प्रशासनाचा गैरवापर होत असल्याचे आरोप होत आहेत. कायदा व नियम डावलून होत असलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील प्रशासनाविषयी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
प्रशासनाच्या नियमांवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणाने शासनाच्या निर्णय प्रक्रियेत असलेले दोष उघड केले आहेत. उच्चाधिकार समितीच्या अनुपस्थितीत घेतलेले निर्णय आणि सूडबुद्धीने चालवलेले प्रशासन, हे लोकशाहीत अशोभनीय असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सरतेशेवटी, न्याय व सत्य याचा विजय व्हावा अशी अपेक्षा आहे. परंतु, प्रशासनाच्या बेकायदेशीर वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नियमांच्या चौकटीत कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची नितांत गरज भासते आहे.