धाराशिव – महायुती सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आज, सोमवार, ३ मार्च २०२५ रोजी धाराशिवमध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (तुळजापूर नाका) येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले.
सरकारविरोधात संतापाचे नारे
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली अनेक आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी “खोटी आश्वासने देणारे सरकार हाय हाय!”, “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी होणार?”, “कर्जमाफी कुठे गेली?”, अशा घोषणा देत सरकारला घेरले.
प्रमुख मागण्या:
- कर्जमाफीचे आश्वासन सरकारने का पाळले नाही?
- ७/१२ कोरा करण्याचे वचन हवेत विरले?
- सौर पंप वाटप कधी होणार? अर्ज करूनही शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही.
- रोजगार हमी योजनेतील कामे तातडीने सुरू करावीत.
- ड्रग्स प्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या CDR तपासणी करून कठोर कारवाई करावी.
- शेतकऱ्यांचे ठिबक व तुषार सिंचन अनुदान लवकर वितरित करावे.
- बी-बियाणे आणि औषधे शेतकऱ्यांना थेट खरेदी करण्याची संधी द्यावी.
- नंबर प्लेटच्या नावाखाली इतर राज्यांच्या तुलनेत वाढवलेले कर कमी करावेत.
जिल्हाधिकारी यांना निवेदन सोपवले
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपले निवेदन सुपूर्द केले. “जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील , अग्निवेश शिंदे यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप, पुढील आंदोलनाचा इशारा
या आंदोलनानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास, काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा देईल.” सरकारने विधानसभा अधिवेशनात या मागण्यांवर तोडगा काढावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.