धाराशिव – विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, पण धाराशिव विधानसभा मतदारसंघात चित्र काही वेगळंच आहे! शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे विद्यमान आमदार कैलास पाटील यांनी अंगाला तेल लावून कुस्ती खेळण्यास सज्ज आहेत. त्यांनी जोरदार तयारी केली आहे, पण महायुतीचा उमेदवार गायब असल्याने कैलास पाटीलसमोर खेळणारा प्रतिस्पर्धा मिळेना! त्यांची अवस्था अशी झाली आहे की, “मैदानात आलोय, पण कुस्ती कोणाशी करायची?”
भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती मात्र अजूनही उमेदवार ठरवण्याच्या चक्रव्यूहात अडकलेली दिसते. भाजपकडून नितीन काळे आणि दत्ता कुलकर्णी उत्साहात आहेत, पण महायुतीच्या गोटात या जागेवर बसण्याची “अस्सल कुस्ती” सुरु आहे. शिवसेना (शिंदे गट) मध्येही सहा धडाडीचे इच्छुक आहेत, पण त्यांचं अजून ‘गादी’वर बसणं बाकीचं आहे.
महायुतीतला गोंधळ इतका वाढला आहे की, शिक्षण सम्राट सुधीर पाटील यांनी तर भोसले हायस्कूलच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलंय. शिवाजी कापसे यांची अवस्था अजून गोंधळलेली आहे. ते ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत आलेत, पण उमेदवारीचं गणित अजूनही जुळून येत नाही!
राष्ट्रवादीतही अशीच कुस्ती आहे! शिक्षक आमदार विक्रम काळे आणि सुरेश पाटील यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे, पण कोणाला तिकीट मिळणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असल्याने वेळ कमी आहे. तरीही महायुतीचा उमेदवार ठरत नाही, त्यामुळं कैलास पाटील यांच्या प्रचारकांनी मात्र बॅनरबाजी सुरु केली आहे – “क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व!”