धाराशिव – बांधकाम कामगार नोंदणी प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या गंभीर स्वरूपाला आता आणखी गंभीर वळण मिळाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात दलाल नेमले गेले असून, त्यांनी शेतकरी, दुकानदार, व्यापारी आणि उद्योगधंदे करणाऱ्यांचीही बांधकाम मजूर म्हणून बनावट नोंदणी करून शासकीय लाभ लाटल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सामान्य मजुरांऐवजी लाभ घेतायत श्रीमंत लोक!
ज्यांच्या नावावर शेती आहे, उद्योगधंदे आहेत, अशा व्यक्तींना “बांधकाम कामगार” दाखवले जात असून, सरकारच्या नावावर येणारे सर्व लाभ हेच लोक पदरात पाडून घेत आहेत. खरे मजूर मात्र या योजनेपासून वंचित राहात आहेत.
कार्यालयीन स्थिती भयावह
या सगळ्या गोंधळात कार्यालयातील स्थिती अधिकच निराशाजनक आहे. कामगार कल्याण अधिकाऱ्यांचे कार्यालय हे कायम रिकामे असते. कर्मचारी “साहेब दौऱ्यावर आहेत” असे सांगून टाळाटाळ करतात. त्यामुळे गरजू लोकांना तासन्तास हेलपाटे मारावे लागत आहेत.
हजेरीची बायोमेट्रिक पद्धतीने नोंद घ्यावी
या पार्श्वभूमीवर, सरकारी कार्यालयात दररोज सकाळ-संध्याकाळ बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी होत आहे.
संपत्तीची चौकशीची मागणी
दरम्यान, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत मिळवलेली संपत्ती संशयास्पद वाटत असून, सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पत्रकारांकडून केली जात आहे.
या प्रकरणात उघडपणे भ्रष्टाचाराचा वास असून, जिल्हाधिकारी आणि उच्चस्तरीय तपास यंत्रणांनी याची तात्काळ दखल घेऊन जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेतून जोरदार मागणी सुरू आहे.