धाराशिव: तालुक्यातील करजखेडा येथे शेतीच्या बांधावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सहदेव पवार (४२) आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार (३७) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी संशयित आरोपी जीवन चव्हाण आणि त्याचे वडील हरिबा चव्हाण घटनेनंतर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार दांपत्य आपल्या दुचाकीवरून (एमएच २५, एयू ४७४३) करजखेडा येथून पाटोदा चौरस्त्याकडे जात होते. यावेळी समोरून कारने (एमएच २४, एएफ ४०६५) येत असलेल्या संशयित जीवन चव्हाण व त्याचे वडील हरिबा चव्हाण यांनी पवार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे पवार पती-पत्नी रस्त्यावर कोसळले. त्यानंतर जीवन, हरिबा आणि त्यांच्यासोबतच्या इतर साथीदारांनी दोघांना रस्त्यावर ओढून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंका पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सहदेव पवार यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
चार वर्षांपूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी
मृत सहदेव पवार आणि संशयित आरोपी हरिबा चव्हाण यांच्यात गेल्या चार वर्षांपासून शेतीच्या बांधावरून वाद सुरू होता. चार वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका भांडणात सहदेव पवार यांनी हरिबा चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची बोटं छाटली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहदेव पवार तीन वर्षे तुरुंगात होते आणि केवळ १५ दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आले होते. याच रागातून आणि बदल्याच्या भावनेतून चव्हाण पिता-पुत्राने कट रचून हे दुहेरी हत्याकांड घडवले असल्याचा पोलिसांना संशय आहे.
घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. बेंबळी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे करजखेडा गावावर शोककळा पसरली आहे.मयत सहदेव पवार (४२) आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार (३७) यांना दोन छोट्या मुली आहेत.
करजखेडा दुहेरी हत्याकांड: अवघ्या २४ तासांत आरोपी पिता-पुत्राला पुण्यातून अटक
करजखेडा दुहेरी हत्याकांड : सूडाचे भयाण वास्तव आणि कायद्याचा वचक