धाराशिव – अणदूर गांजा प्रकरणात निलंबित करण्यात आलेले तुळजापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांना धाराशिव जिल्हा न्यायालयाने आणखी एक दणका दिला आहे. तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांचा मुलगा अभिजीत माने याची सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करून, खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांचा मुलगा अभिजीत माने ( वय २८ ) हा २३ मार्च २०२० रोजी कोरोना लॉकडाऊन असतानाही स्कुटीवरून शहरात फिरत असताना, पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांनी त्यास हटकले असता, अभिजीत माने याने मी कुणाचा मुलगा आहे माहित नाही का ? माझ्या वडिलांवर तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरत नाही, अशी उद्धट उत्तरे दिल्यामुळे दि. २४ मार्च २०२० रोजी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि ३५३, ३३२, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे अनेक तक्रारी केल्याने झिंजुर्डे यांनी जाणीवपूर्वक अभिजीत माने यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला होता तसेच रस्त्यावर आणि कोठडीत काठीने बेदम मारहाण केली होती. त्याची लेखी तक्रार राज्य मानवी आयोगाकडे करण्यात आली असून, त्यात देखील पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांना नोटीस वाजवण्यात आली आहे. आमचे किराणा दुकान असून, किराणा सामान आणण्यासाठी जात असताना, पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांनी खोटा गुन्हा दाखल केला होता, असे तक्रारीत म्हटले आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी धाराशिव जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांच्यासमोर सुनावणी झाली असता, ही केस खोटी असल्याचे निष्पन्न झाले आणि याप्रकरणी अभिजीत माने याची निर्दोष मुक्तता करून, खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आला आहे . या निकालानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तुळजापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांच्यावर कोणती कारवाई करतात ? याकडे लक्ष वेधले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे सध्या गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असल्याचे समजते.
गांजा प्रकरणात निलंबित
गणेश झिंजुर्डे हे पूर्वी तुळजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तेथून वाशीला बदली झालेली असताना त्यांनी वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता दि.१७ जून २०२० च्या मध्यरात्रीनंतर ते दि.१८ जूनच्या पहाटेदरम्यान नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अणदूर येथे एका अलिशान कारमधून नेण्यात येत असलेला गांजा पकडला होता. परंतु, या कारवाईदरम्यान कारमध्ये नोंदीला आलेल्या दोन आरोपींसह अन्य एक महिला आरोपीही असताना तीला या प्रकरणात नोंदीला न घेता सोडून देत दोघांना अटक दाखवून याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. गांजा प्रकरणी जप्त करण्यात आलेले वाहन एम.एच. २५, एएल ९१९९ हे मीना पाटील यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी अन्य दोन आरोपीना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी असलेल्या मीना पाटील यांना आर्थिक देवाण घेवाण करून सोडून देण्यात आले होते.
त्याची बातमी धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केल्यानंतर या गांजा प्रकरणी तत्कालीन पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी पोलिस उपनिरीक्षक झिंजुर्डे व पोलिस नाईक रवी राऊत यांना दि.२३ जून २०२० रोजी निलंबित केले होते.