धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव , लोहारा आणि वाशी हे तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असले तरी अन्य पाच तालुक्यात देखील दुष्काळी परिस्थिती असल्याने संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा , अशी मागणी राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ३१ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. परंतु संपूर्ण जिल्ह्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षाच्या सरासरीनपेक्षा १.६ मीटरने घसरली आहे. जिल्ह्यातील तलावातील जलसाठा १२ टक्के आहे. रब्बी पेरणी गतवर्षीच्या तुलनेत अर्ध्यावरच राहिली आहे. शासनाने धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके जरी ट्रिगर-२ लागू झाले असले तरी पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.
मराठवाड्यात सर्वात जास्त पशुधन असलेला धाराशिव जिल्हा आहे. तथापि जिल्ह्यामध्ये जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामधील उर्वरित पाच तालुकेसहित पीक व पाण्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) चे प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय पाटील – दुधगावकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत त्यांनी मुख्यमंत्र्याना हे निवेदन दिले आहे.