अहो मंडळी, धाराशिव जिल्ह्याचं नाव ऐकलंय का? अहो, तोच तो… जो देशाच्या मागास यादीत अभिमानाने तिसरा क्रमांक पटकावून बसलाय. पण मागासलेल्या जिल्ह्याचा टॅग लागला म्हणून काय झालं, राजकारण मात्र एकदम ‘टॉप गियर’ मध्ये!
आपल्या कथेचे दोन मुख्य पात्र म्हणजे शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा पाटील. आता गंमत म्हणजे हे दोघे चुलत बंधू! पण बंधूप्रेम? छे हो! यांच्यात तर आडवा विस्तव जात नाही . एकमेकांना पाण्यात बघणं हा तर जणू यांचा रोजचा कार्यक्रम!
पहिला अंक: ‘ड्रग्ज’ कनेक्शन आणि निवडणुकीची वाट
खासदार ओमराजेंनी नुकताच एक ‘हाय व्होल्टेज’ आरोप केलाय. त्यांचं म्हणणं आहे की, आमदार राणा पाटलांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची माहिती डिसेंबर २०२३ पासून होती. पण भाऊसाहेब गप्प! का? तर म्हणे लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. ओमराजेंचा सवाल अगदी थेट, “वर्षभर गप्प का बसलात? निवडणुकीची वाट बघत होता काय?”
आता यावर राणा पाटलांनी काय उत्तर द्यावं? त्यांनी नामी शक्कल लढवली. स्वतः काही बोलायचंच नाही, ‘पाहुण्याच्या हातून साप मारणे’ ही पद्धत अवलंबली. त्यांचे ‘संकटकाळचे मित्र’ आणि भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी धावून आले. कुलकर्णींनी थेट विषयाला बगल देत म्हटलं, “आता कौडगाव एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल पार्क होणार म्हणून ओमराजेंच्या पोटात दुखतंय!”
यावर ओमराजे आणखीनच भडकले. “अहो, आम्ही विचारतोय काय आणि तुम्ही सांगताय काय? ड्रग्ज प्रकरण चांगलं आहे का? याला तुमचा पाठींबा आहे का, हे भाजपने जाहीर करावं. आम्ही काय राजकीय आरोप केला नाही, कोर्टातल्या चार्जशीटमधल्या त्रुटींवर बोट ठेवलं. प्रश्न विचारला तर उत्तर मिळतंय ‘मामा गावाला गेला!'” वाह! काय राजकीय जुगलबंदी!
दुसरा अंक: ‘मंत्री’पदाची हौस आणि खुर्चीचा मोह
आता दुसरी गंमत बघा. आमदार राणा पाटील हे ‘मित्रा’ संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, पण त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा नाही. तरीही १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांच्यासमोर चक्क ‘राज्यमंत्री’ अशी नेमप्लेट! खासदार ओमराजेंनी ही संधी कशी सोडावी? त्यांनी लगेच टोला लगावला, “दोन हाना, पण मला मंत्री म्हणा!” म्हणजे मारलं तरी चालेल, पण मान मोठा हवा!
यावरही राणा पाटील ‘चिडीचूप’! पण त्यांच्या सोशल मीडियाची धुरा सांभाळणारे पगारी बहाद्दर इर्शाद काझी कसे गप्प बसतील? त्यांनी फेसबुकवर खासदारांना डिवचलं, “पालकमंत्र्यांच्या बाजूला बसायची संधी गेली म्हणून खासदार महोदयांची रडारडी सुरू आहे.” झालं! ठाकरे गटाचे शहरप्रमुख सोमनाथआप्पा गुरव यांनी लगेच कमेंट टाकली, “कायम भावी पालकमंत्री!” आता काझीना हे काही रुचलं नाही. उत्तराऐवजी त्यांनी थेट गुरव यांनाच ब्लॉक करून टाकलं! लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणे!
उपसंहार: धाराशिवकरांना मनोरंजनाची मेजवानी
एकंदरीत काय, तर धाराशिवच्या विकासाचा रथ भलेही थोडा अडखळत चालला असेल, पण राजकीय आखाड्यात मात्र रोज नवनवीन डावपेच आणि शाब्दिक चकमकी बघायला मिळत आहेत. एका बाजूला ड्रग्जचे आरोप, तर दुसऱ्या बाजूला खुर्ची आणि नेमप्लेटची हौस. कोण कोणाला कधी ‘ब्लॉक’ करेल, कोण कोणाची ‘फिरकी’ घेईल, याचा नेम नाही. धाराशिवकरांना मात्र यातून रोजच्या रोज मनोरंजनाचा एक नवा ‘एपिसोड’ बघायला मिळतोय, हे मात्र नक्की! बघूया, या ‘टॉम अँड जेरी’च्या खेळात पुढे काय काय घडतंय! तोपर्यंत, पॉपकॉर्न तयार ठेवा!
- बोरूबहाद्दर