बेंबळी – धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे एका ७५ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचे चारचाकी गाडीतून अपहरण करून, जंगलात नेऊन जातीवाचक शिवीगाळ करत बेल्टने आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नऊ आरोपींविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनार्दन नारायण आदटराव (वय ७५, रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव) असे फिर्यादी वृद्धाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ मे २०२५ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाटोदा शिवारातील जंगलात ही घटना घडली.
आरोपी शिवाजी शंकर भोसले, सुधीर बलभिम भोसले, शहाजी रामहारी भोसले, रोहीत शिवाजी भोसले, बालाजी बलभिम भोसले, पांडुरंग लिंबराज भोसले, सचिन लिंबराज भोसले, लिंबराज शंकर भोसले, आणि रोहन शिवाजी भोसले (सर्व रा. करजखेडा) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून जनार्दन आदटराव यांना जबरदस्तीने एका चारचाकी गाडीत घातले. त्यानंतर त्यांना पाटोदा शिवारातील जंगलात नेऊन जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, बेल्टने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले.
या घटनेनंतर भयभीत झालेल्या जनार्दन आदटराव यांनी ७ जून २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व नऊ आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १८९(३), १८९(४), १९१(१),(२), १९०, ३५२, ३५१(२), १२७(२) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(वाय) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.