धाराशिव: धाराशिव शहरातील दत्त कॉलनी येथील रहिवासी असलेल्या सविता राजेश म्हैत्रे (वय ४९) यांच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
सविता म्हैत्रे या त्यांचे पतींसह मोटरसायकलवरून समता कॉलनी येथील दत्त मंदिर समोरील रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी गंठण (किंमत अंदाजे १ लाख रुपये) जबरदस्तीने हिसकावून पळून गेला.
याप्रकरणी सविता म्हैत्रे यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३९० (४) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.धाराशिव शहरात दिवसाढवळ्या चोऱ्या, लूटमार होत असल्याने शहरात घबराट पसरली आहे, पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगार निर्ढावले आहेत.
धाराशिवमध्ये लग्नाच्या कार्यक्रमातून दोन मोबाईल चोरी
धाराशिव: शहरातील सांजा रोडवरील २२० के.व्ही. सबस्टेशनजवळ राहणारे कृष्ण श्रीपाद कुलकर्णी (वय ४३) यांच्या पत्नीच्या पर्समधून दोन मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही घटना ३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समता कॉलनी येथे घडली.
कुलकर्णी हे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी समता कॉलनीतील आर.डी. कुलकर्णी यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने ज्युपिटर स्कूटीला आडकावून ठेवलेल्या दोन पर्समधील दोन मोबाईल फोन (किंमत अंदाजे २२,००० रुपये) अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
याप्रकरणी कृष्ण कुलकर्णी यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७९ (२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.