बेंबळी : चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्याच पत्नीच्या नाकाचा शेंडा कांदा कापण्याच्या चाकूने कापून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना धाराशिव तालुक्यातील बरमगाव येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी, दि. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पीडित महिलेचा भाऊ वैजिनाथ तानाजी कांबळे (वय ४०, रा. बरमगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती वामन मारुती सगट (रा. लोणी काळभोर, पुणे, ह.मु. बरमगाव) याच्या विरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वामन सगट हा त्याची पत्नी चंद्रकला वामन सगट (वय ३५) हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. याच संशयातून गुरुवारी पहाटे त्याने चंद्रकला यांच्यासोबत वाद घातला. वादाचे रूपांतर क्रूर हल्ल्यात झाले. चेहरा विद्रूप करण्याच्या उद्देशाने आरोपी वामनने घरातील कांदा कापण्याच्या चाकूने चंद्रकला यांच्या नाकाचा शेंडा कापला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनेनंतर पीडितेचे भाऊ वैजिनाथ कांबळे यांनी तात्काळ बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती वामन सगट याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अमानुष घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बेंबळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







