धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. धाराशिव ग्रामीण, परंडा आणि नळदुर्ग येथे हे गुन्हे नोंदवण्यात आले असून, यामध्ये फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे, आर्थिक व्यवहारातून ब्लॅकमेल करणे आणि जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
धाराशिव ग्रामीण: मुलीच्या इन्स्टाग्रामवरून फोटो केले व्हायरल
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३६ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जुलै २०२४ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत गावातीलच एका तरुणाने आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून आणि महिलेचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. नराधमाची मजल एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याने पीडित महिलेच्या मुलीचे इन्स्टाग्राम अकाउंट वापरून सदर छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केली. याप्रकरणी पीडितेने २९ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम-64(1) (2)(एम), 351(2)(3) सह कलम 66 ब, 66 ई माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंडा: घरात घुसून मारहाण आणि अत्याचार
परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३९ वर्षीय महिलेवर २० डिसेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२५ या काळात अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने पीडितेच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.दं. वि. सं.कलम-376 (2)(एन), 354(ड), 354(क), 354(ब), 341,452,427, 323,504, 506 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नळदुर्ग: अंघोळ करतानाचे फोटो काढून ब्लॅकमेलिंग
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २३ वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. २५ व २६ नोव्हेंबर २०२५ रोजी गावातील एका तरुणाने पीडित तरुणी अंघोळ करत असतानाचे छायाचित्र काढले. हे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला आपल्या शेतातील शेडमध्ये डांबून ठेवले आणि तिथे तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित तरुणीने २९ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांत भा.न्या. सं.कलम-115(2),127(6), 351(3), 71, 78 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच दिवशी दाखल झालेल्या या तीन गंभीर गुन्ह्यांमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.







